जांभळाचा सुकाळ म्हणजे दुष्काळाची चाहूल? या दाव्यात किती तथ्य? स्ट्रेस फ्रुटिंग प्रक्रियेशी काही संबंध आहे का? 

जांभळाच्या झाडांना जेव्हा भूगर्भातील पाण्याची कमतरता जाणवते किंवा प्रतिकूल हवामानाची चाहूल लागते. तेव्हा ती स्वतःचं अस्तित्व धोक्यात आल्याचं समजून मोठ्या प्रमाणावर फळं निर्माण करतात, असं म्हटलं जातं.

जाहिरात
Read Time: 3 mins

लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी

Jalna News : सोशल मीडियावर सध्या एक संदेश चांगलाच व्हायरल होत आहे. जांभळाचा सुकाळ म्हणजे दुष्काळ असा दावा यात केला जात आहे. यंदाच्या हंगामात जांभळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर झालंय.. बाजारात.. रस्त्यावरही तुम्हाला जांभळाची विक्री करणारे मोठ्या प्रमाणात दिसत असतील. जांभळाचा सुकाळ म्हणजे दुष्काळाची चाहूल असा एक ग्रामीण भागातला समज आहे. पूर्वीही ‘जांभळाचे सडे म्हणजे दुष्काळाच्या झळा' अशी समजूत होती. त्यामुळे या संदेशाला फार गांभीर्याने घेतलं जातंय. 

जांभळाच्या झाडांना जेव्हा भूगर्भातील पाण्याची कमतरता जाणवते किंवा प्रतिकूल हवामानाची चाहूल लागते. तेव्हा ती स्वतःचं अस्तित्व धोक्यात आल्याचं समजून मोठ्या प्रमाणावर फळं निर्माण करतात. यालाच 'स्ट्रेस फ्रुटिंग' किंवा 'मास्टिंग' म्हटलं जातं. त्यामुळे जांभळांचा मोठा सडा पडणे म्हणजे येणाऱ्या दुष्काळाचा नैसर्गिक इशारा असल्याचा दावा केला जातो. पण या दाव्यात कितपत तथ्य आहे?  आणि स्ट्रेस फ्रुटिंग किंवा मास्टिंगची प्रक्रिया म्हणजे नेमकी काय असते ? हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात.  

Advertisement

नक्की वाचा - लोणावळा विरुद्ध महाबळेश्वर, काय सर्वात भारी? पुढच्या ट्रिपसाठी बेस्ट ठिकाण कसं निवडाल?

स्ट्रेस फ्रुटिंग किंवा मास्टिंगची प्रक्रिया म्हणजे नेमकी काय ? 

‘मास्टिंग' ही वनस्पतीशास्त्रातील मान्यताप्राप्त संकल्पना आहे. यामध्ये एखाद्या प्रजातीची झाडे काही वर्षांनी एकत्रितपणे मोठ्या प्रमाणात फळे आणि बिया तयार करतात. झाडांना पाण्याचा ताण जाणवला तर ती अधिक फळे तयार करण्याचा प्रयत्न करतात, हे विज्ञान मान्य करते. मात्र, याचा अर्थ झाडे भविष्यातील दुष्काळाची भविष्यवाणी करतात याला तज्ज्ञांचा दुजोरा नाही. 

जांभळाचं उत्पादन वाढलं म्हणजे दुष्काळ येणार ? 
 

जांभळाचा सडा आणि दुष्काळ यांचा थेट संबंध असल्याचं कोणतंही ठोस वैज्ञानिक संशोधन अद्याप उपलब्ध नाही. झाडांना आलेली भरघोस फळधारणा ही अनुकूल हवामान, मातीतील पोषक घटक अशा विविध घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे केवळ जांभूळ जास्त प्रमाणात लागल्याने दुष्काळ पडेल, असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नसल्याचं जाणकारांचं मत आहे. पण ग्रामीण समजूती किंवा अनुभवी लोकांची मतं अगदीच फोल ठरतील असंही नाही. कारण अशा समजूती वर्षानुवर्षांच्या निरीक्षणातून रुढ झालेल्या असतात. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे भारताच्या मान्सूनवर परिणाम करणाऱ्या अल निनोचा शोध. 

अल निनोचा शोध 16 व्या शतकात दक्षिण अमेरिकेतील पेरू देशात लागला. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील स्थानिक मच्छिमारांचं निरीक्षण यात महत्त्वाचं ठरलं होतं. दर चार वर्षांनी नाताळच्या सुमारास प्रशांत महासागराचं पाणी अचानक उबदार होत असे. स्थानिक मच्छिमारांनी या बदलाला अल निनो असं नाव दिलं. पुढे प्रशांत महासागरातील या बदलांचं निरीक्षण आणि संशोधन केलं गेलं. यानंतर 'अल निनो'मुळे जगात होणाऱ्या पाऊसपाणी आणि हवामान बदलाचा संबंध उजेडात आला.
 
जांभळाचा सडा म्हणजे दुष्काळाची चाहूल याला वैज्ञानिक आधार नाहीच. मात्र हवामानातील बदलांचे संकेत अशा नैसर्गिक घटनांमधून मिळतात हे देखील नाकारता येणार नाही. त्यामुळे येत्या काळात पाऊस पाणी कसा असेल यावर हे सगळे अंदाज खरे की खोटे हे  स्पष्ट होईल.