शुभम बायस्कार, अमरावती:
BJP MLA Pravin Tayde On Bacchu kadu: अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी विधानसभेत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यावर एकाच वेळी अनेक गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामुळे अचलपुरात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध प्रहार असा सामना होणार असल्याच दिसत आहे. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. अधिवेशनादरम्यान आपल्या मतदारसंघातील विविध मागण्या मांडताना आमदार प्रवीण तायडे यांनी थेट माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर टीका केली आहे.
बच्चू कडूंवर घणाघाती टीका
तायडे यांनी थेट शब्दांत सांगितले की, बच्चू कडूंनी संपूर्ण आयुष्य नौटंकीवर काढलं!" गरीब असल्याचं नाटक करायचं, सरकारमधील सूत्रांकडून माहिती मिळवायची, आंदोलनाच्या तारखा ठरवायच्या आणि नंतर कर्जमाफीचं श्रेय लाटायचं हाच यांचा उद्योग असल्याचा आरोप तायडे यांनी केला. "बच्चू कडू तब्बल अडीच वर्षे मंत्री होते, २० वर्षे सरकारसोबत होते, मग बंद पडलेले सिंचन प्रकल्प सुरू का करता आले नाहीत?" असा घणाघाती सवाल तायडे यांनी केला.
तसेच "यातूनच सिद्ध होतं की बच्चू कडू शेतकऱ्यांबाबत किती उदासीन आहेत!"असेही ते म्हणाले. सर्वात गंभीर आरोप करताना तायडे म्हणाले — "माझं बनावट लेटरहेड वापरून अचलपूर मतदारसंघाचा निधी मोर्शी मतदारसंघात वळवण्याचं षडयंत्र रचण्यात आलं!"— या बनावट दस्तावेवज प्रकरणाचा तपास व्हावा अशी त्यांनी मागणी केली.
विधानसभेत तायडे यांनी थेट मागणी
"बच्चू कडूंच्या गेल्या २० वर्षांतील संपत्तीची, निधी वापराची व आंदोलनांमागील सत्याची चौकशी करा — घबाड बाहेर काढा! या संदर्भातील माहिती देण्यासाठी मी तयार आहे असं म्हणत त्यांनी एक प्रकारे तपास यंत्रणांना आवाहन दिल आहे. तायडे यांनी हेही नमूद केले की, लोकांचं लक्ष स्वतःकडे वळवण्यासाठी बच्चू कडू मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका करतात. हे नेतृत्वाला साजेसं नसल्याचेही त्यांनी ठणकावले. वारंवार असं होत असल्याने आमचा आणि कार्यकर्त्यांचा संयम सुटत चालला आहे. याला आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांना दिला आहे.
Palghar News: नाकाबंदीत ट्रिपल सीट आले, मोठ्या गुन्ह्याचे बिंग फुटले, 'असा' लागला छडा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world