Marathi Language Row: महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मराठी भाषा अस्मितेचा मुद्दा तापला आहे. कारण ठरलं आहे ते त्रिभाषा सूत्री, हिंदी भाषेची सक्ती, त्याला राज आणि उद्धव ठाकरेंनी केलेला विरोध आणि त्यानंतर या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र घेतलेला विजयी मेळावा. शनिवारी (5 जुलै 2025) राज आणि उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळाव्यात भाषणे केली. यामध्ये त्यांनी मराठी भाषेच्या मुद्दावरून अधिक आक्रमक भूमिका धारण करण्याचे स्पष्ट संकेत दिले. यासंदर्भात शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटले की, छत्रपती संभाजी महाराज 16 भाषा शिकले म्हणजे ते मूर्ख होते का? त्यांच्या या विधानावरून वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
( नक्की वाचा: मनसे-शिवसेना युती होणार? राज-उद्धव यांच्या भाषणातील 'त्या' वक्तव्यांवरून स्पष्ट संकेत )
हडोळतीतील दाम्पत्याला 2 बैल जोड्या भेट
लातूर जिल्ह्यातील हडोळतीमधील एका वयोवृद्ध शेतकरी दाम्पत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. बैल नसल्याने शेतकऱ्याने स्वत: नांगर ओढत असल्याचे यातून दिसत होते. या शेतकऱ्याला बैलजोडी देणार असल्याची घोषणा संजय गायकवाड यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी या दाम्पत्याची भेट घेतली. गायकवाड यांनी पवार दाम्पत्याचे पाय धुतले आणि त्यांना वर्षभरासाठी लागणारे रेशन दिले. मी स्वतः शेतकरीपुत्र असल्याने शेतकऱ्यांच्या व्यथा मला माहित आहेत आणि मी त्या भोगूनच पुढे आलो असल्याचं आमदार गायकवाड यांनी म्हटले आहे.
( नक्की वाचा: एकत्र आले मात्र युती होणार? राज यांचा सावध पवित्रा )
बाळासाहेब असतानाही 70-74 हून जास्त आमदार आले नाही
संजय गायकवाड यांना राज आणि उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, "15 वर्षांआधी हे दोघे एकत्र आले असते तर काहीतरी परीणाम जाणवला असता. बाळासाहेबांचा विचार सोडून उद्धव ठाकरे गेल्याने हिंदुत्व शिल्लक राहीले नाही. राज ठाकरेंनी टाळी द्यायला उशीर केला. लोकांची कामे किती करता यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असता. ठाकरे ब्रँड राहिलेला नाही, ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना 288 जागा जिंकून आल्या असत्या. तेव्हाही 70-74 च्या पुढे आपण गेलो नाही. "
मराठी भाषेवरून केलेल्या विधानामुळे वाद पेटणार ?
गायकवाड यांनी म्हटले की, "छत्रपती संभाजी महाराज 16 भाषा शिकले म्हणजे ते मूर्ख होते ? छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते, ताराराणी, येसूबाई, जिजाऊ माँसाहेब यांनी हिंदी भाषेसह अनेक भाषा शिकल्या; मग ते मूर्ख होते का ?" त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.