अमोल सराफ, प्रतिनिधी
Buldhana news : सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात इंधन टंचाईमुळे हाहाकार उडाला आहे. अनेक ग्रामीण भागातील पंपावर डिझेल घेण्यासाठी मोठी रांग लागत आहे. बुलढाणा जिल्ह्यात डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक पंपावर वाहनाच्या रांगा अद्याप कायम असून पंप चालक, ग्राहक तसेच पंप कर्मचारी यांच्यात वाद, हाणामारीच्या घटना वाढतच आहेत.
डिझेल भरण्यासाठी ग्राहकांना कूपन...
या सगळ्यांना फाटा देत मेहकर ते चिखली मार्गावरील काठोळे या पंप चालकाने वाद, हाणामारी आणि गर्दी टाळण्यासाठी एक नामी शक्कल लढवली आहे. डिझेल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना चक्क कूपन वाटप सुरू केलं आहे. मागील चार-पाच दिवसांपासून ही शक्कल लढवल्याने पंपावरील गर्दी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
या युक्तीमुळे पेट्रोल पंपावरील वाद, हाणामारी यासारख्या घटनांना सुद्धा आळा बसल्याचं दिसत आहे. याशिवाय दररोज 200 कूपन वाटत असल्याने आलेल्या प्रत्येक ग्राहकांना डिझेल मिळत असल्याने त्याचंही समाधान होत आहे. शिवाय या पंप चालकाचं सर्वांकडून कौतुक होत असून याचा आदर्श इतरही लोकांना घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world