अमोल सराफ
पती-पत्नीमधील घरगुती वाद किती टोकाला जाऊ शकतो, याचा एक अत्यंत भयंकर आणि मन सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील भाले अंजन गावात एका पित्याने आपल्या 4 निष्पाप मुलांना विहिरीत फेकून त्यांची हत्या केली. त्या नंतर त्याच विहिरीत उडी घेऊन स्वतःही आत्महत्या केली. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रात तीव्र खळबळ उडाली आहे. विजय किराडिया असे आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे. या मागचे कारण ही तेवढेच धक्कादायक आहे.
पत्नी माहेरी गेल्याने नैराश्य
विजय किराडिया यांचे त्यांच्या पत्नीसोबत वारंवार घरगुती वाद होत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी भांडण करून माहेरी निघून गेली होती. मुलांना ही तिने सोबत नेले नव्हते. पत्नी घरात नसल्यामुळे विजय स्वतः घरकाम करत होते. दरम्यान, रविवारी नातेवाईकांनी त्यांना 'तुमची बायको कुठे गेली? तुम्ही एकटेच घरकाम का करत आहात?' अशी विचारणा केली. नातेवाईकांच्या या प्रश्नांमुळे विजय प्रचंड मानसिक तणावाखाली गेला. ते विचारांच्या गर्तेत अडकले. त्यातूनच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला.
4 निरागस मुलांचा अंत
या नैराश्यातून रविवारी रात्री त्यांनी एक अत्यंत टोकाचे पाऊल उचलले. विजय आपल्या 4 चिमुकल्यांना घेऊन धरण परिसरातील एका विहिरीवर गेले. तिथे त्यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रीत किराडिया, प्राची किराडिया, पूर्वी किराडिया आणि पियुष किराडिया या 4 मुलांना एकापाठोपाठ एक विहिरीत फेकून दिले. मुलांना पाण्यात फेकल्यानंतर विजय यांनी स्वतःही त्याच विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. सोमवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच शोककळा पसरली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
गावावर शोककळा
काळजाचा थरकाप उडवणारीच ही घटना होती. ज्यावेळी सकाळी गावकऱ्यांना पाच जणांचे मृतदेह विहीरीत दिसले त्याच वेळी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. छोट्या छोट्या गोष्टीमुळे संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झालं. या घटनेनं संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय एकाच गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे. जिल्ह्यात या हत्येचीच चर्चा सुरू आहे. भांडण पती पत्नीचे असताना त्याची शिक्षा त्या निरागस मुलांना का असा प्रश्न ही उपस्थित केला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world