अमोल सराफ, प्रतिनिधी
Buldhana News : सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या, लग्नसराई सुरू आहे. त्यातच एसटीचं वाढलेलं प्रवासी भाडे आणि उन्हाळ्याचा तडाखा या सर्व गोष्टींमुळे रेल्वेने प्रवास करण्यास प्राथमिकता दिली जात आहे. मात्र सुट्टीमुळे सर्वच गाड्या फुल्ल असल्याने नागरिकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यातच रेल्वे प्रशासनाने विकेंड विशेष स्पेशल रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाकडून स्पेशल रेल्वे गाड्या...
मुंबई–नागपूर तसेच पुणे–नागपूर मार्गावर साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात येणार असून या गाड्यांना मलकापूर येथे अधिकृत थांबा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे बुलढाणा जिल्ह्यातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मलकापूर हे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे महत्त्वाचे रेल्वे स्थानक असल्याने येथे थांबा देण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. अखेर ही मागणी मान्य झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.
मलकापूर जिल्हा प्रवासी सेवा संघ आणि तालुका प्रवासी मंडळाच्या माध्यमातून ही माहिती जाहीर करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष महेंद्रकुमार बुरड तसेच तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष पारसमल झाबक यांनी या निर्णयाचं स्वागत करत रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत. त्यांच्या मते, या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना मोठ्या शहरांमध्ये जाण्यासाठी अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेषतः विद्यार्थी, नोकरी करणारे तसेच सुट्टीसाठी प्रवास करणाऱ्या कुटुंबांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आतापर्यंत मलकापूर येथून थेट गाड्यांची मर्यादित सुविधा असल्यामुळे प्रवाशांना इतर स्थानकांवर जावं लागत होतं. आता मात्र ही अडचण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मुंबई–नागपूर दरम्यान एकूण चार साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. तसेच पुणे–नागपूर मार्गावरही दोन विशेष गाड्या धावणार आहेत.
नक्की वाचा - Pune News : मिसिंग लिंकवरुन जाताना ही चूक करू नका; महामार्ग पोलिसांकडून मोठी कारवाई
या गाड्यांच्या वेळापत्रकामुळे प्रवाशांना सोयीस्कर वेळेत प्रवास करता येणार आहे. या विशेष गाड्यांचं आरक्षण 29 एप्रिलपासून सुरू करण्यात आले आहे. प्रवासी सर्व आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावरून तिकीट बुक करू शकतात. उन्हाळी सुट्यांमध्ये तिकीटांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने प्रवाशांनी लवकरात लवकर आरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे या गाड्या मलकापूर नांदुरा व शेगाव येथे देखील थांबा मिळत असल्याने संपूर्ण जिल्ह्याला याचा मोठा फायदा होणार आहे. मुख्यतः संतनगरी शेगाव येथे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची गर्दी लक्षात घेता पुणे आणि मुंबई या भागातून विशेष श्रीभक्त देखील शेगावत दाखल होत असतात. अशातच विकेंड विशेष गाड्यांमुळे त्यांचा प्रवास निश्चितच सुखकर होणार आहे.
१ आणि ३ मे रोजी विशेष गाड्या सुटल्या...
ट्रेन क्रमांक 01021 ही गाडी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1 आणि 3 मे रोजी रात्री 12.30 वाजता सोडण्यात आली आणि त्याच दिवशी दुपारी 3.45 वाजता नागपूर येथे पोहोचली. परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक 01022 नागपूरहून रात्री 9.40 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 1.50 वाजता मुंबईत पोहोचली. तसेच पुणे–नागपूर मार्गावरही दोन विशेष गाड्या धावणार आहेत. ट्रेन क्रमांक 01467 ही गाडी पुणे येथून 1 मे रोजी दुपारी 3.50 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 8.05 वाजता नागपूरला पोहोचली. तर ट्रेन क्रमांक 01468 ही गाडी नागपूरहून 3 मे रोजी सकाळी 7 वाजता सुटून त्याच दिवशी रात्री 11.30 वाजता पुण्यात दाखल झाली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world