 
                                            अमोल गावंडे, बुलढाणा
Buldhana Voter ID Scam: एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच राज्यात बोगस मतदार याद्या, वोटचोरीच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी रान उठवले आहे. महाविकास आघाडीनंतर आता राज ठाकरेंनीही यावरुन आक्रमक भूमिका घेत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. अशातच आता बुलढाण्यामध्येही असाच बोगस मतदार नोंदणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेला "वोटचोरीचा गंभीर मुद्दा शिवसेना ठाकरे गटाने बुलढाणा जिल्ह्यात पुराव्यांसह अधोरेखित केला आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत मोठा 'महाघोळ' असल्याचा सनसनाटी आरोप शिवसेना (उबाठा) गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या घोळामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
काय आहेत आरोप?
शिवसेनेच्या राज्याच्या प्रवक्त्या अॅड. जयश्रीताई शेळके यांनी पत्रकार परिषदेत हा संपूर्ण प्रकार समोर आणला. त्यांनी दिलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. बुलढाणा मतदारसंघामध्ये तब्बल ७,५०० पर्यंत दुबार मतदार असल्याचा गंभीर आरोप शेळके यांनी केला आहे. मतदार यादीत ५,२९१ मतदार मयत असून, त्यांच्या नावावर मतदान झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
या घोटाळ्याचा कळस म्हणजे, सागवन येथील १२३ घर क्रमांक असलेल्या एकाच घरामध्ये चक्क १२६ लोक राहत असल्याचे मतदार यादीत दिसून आले आहे. विशेष म्हणजे, हे सर्व मतदार विविध जाती-धर्माचे आहेत. अॅड. जयश्री शेळके यांच्यासह जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवतआणि डी. एस. लहाने यांनी निवडणूक आयोगाकडे तातडीने मागणी केली आहे.
( नक्की वाचा : Bihar Election : 'PM मोदी मतांसाठी स्टेजवर नाचूही शकतात...'; बिहार निवडणुकीत राहुल गांधींचं वादग्रस्त वक्तव्य )
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुकांपूर्वी हा मतांचा घोळ थांबवावा आणि बोगस मतदारांना वगळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. मतदार यादीतील या घोळामुळे लोकशाही प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
