रामराजे शिंदे, प्रतिनिधी
Bihar Assembly Election 2025 : बिहारच्या राजकारणात 'सीमांचल' (Seemanchal) भागाला विशेष महत्त्व आहे. हा भाग राष्ट्रीय जनता दलाचा (RJD) पारंपरिक गड मानला जातो. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत या भागात असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी तगडे आव्हान उभे केल्यामुळे तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मुस्लिम मतदारांची दिशा काय असेल, यावरच बिहारच्या सत्तेचा 'हायवे' ठरणार आहे.
आरजेडीच्या गडाला आव्हान
सीमांचल भागात अररिया, पूर्णिया, किशनगंज आणि कटिहार या 4 जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या एकूण 24 जागा आहेत. मुस्लिम आणि यादव (M-Y) समीकरण एकत्र आल्यास बिहारमध्ये सत्ता मिळवणे आरजेडीसाठी सोपे होते. याच समीकरणाला मजबूत करण्यासाठी लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी सीमांचल भागावर नेहमीच विशेष लक्ष दिले होते. भाजपची रथयात्रा अडवल्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली आणि सीमावर्ती भागात आरजेडीचे वर्चस्व निर्माण झाले. मात्र, या निवडणुकीत ओवैसी आणि प्रशांत किशोर यांच्यामुळे मुस्लिम व्होट बँक विभागण्याची भीती निर्माण झाली आहे.
( नक्की वाचा : Bihar Election : 'PM मोदी मतांसाठी स्टेजवर नाचूही शकतात...'; बिहार निवडणुकीत राहुल गांधींचं वादग्रस्त वक्तव्य )
ओवैसींचे वाढते वर्चस्व
- मागील, 2020 च्या निवडणुकीत सीमांचल भागात आरजेडीला मोठा धक्का बसला होता.
- राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने सर्वाधिक 12 जागा जिंकल्या.
- महागठबंधन (Mahagathbandhan) ला केवळ 7 जागा मिळाल्या.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे, असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम (AIMIM) पक्षाने 5 जागा जिंकून सीमांचलच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला. विशेषतः किशनगंज जिल्ह्यात ओवैसींनी 4 जागा जिंकून आरजेडीच्या गडाला जोरदार हादरा दिला होता.
ओवैसींचा 'सीमांचल प्लॅन'
ओवैसी यांनी मागील निवडणुकीत सीमांचलमध्ये 19 जागा लढवल्या आणि 5 जागांवर विजय मिळवला. आकडेवारीनुसार, सीमांचल भागातील सुमारे 11 टक्के मुस्लिम मतदारांनी ओवैसींना मतदान केले होते. यावेळेस त्यांनी एकूण 25 उमेदवार रिंगणात उतरवले असून त्यापैकी 14 उमेदवार केवळ सीमांचल भागातील आहेत. याचाच अर्थ ओवैसी यांनी पुन्हा एकदा याच भागावर लक्ष केंद्रित केले आहे. मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांची आक्रमक भाषणे सुरू आहेत. त्यांनी "मुस्लिमांची 17 टक्के लोकसंख्या असलेल्या बिहारमध्ये मुस्लिम मुख्यमंत्री का बनू शकत नाही?" असा सवाल उपस्थित करून मुस्लिम मतदारांना विचार करायला लावले आहे.
प्रशांत किशोर यांचाही 'एम-फॅक्टर'
आरजेडी आणि काँग्रेसच्या पारंपारिक मुस्लिम व्होट बँकेला धक्का देण्यासाठी ओवैसींसोबतच प्रशांत किशोर यांनीही कंबर कसली आहे. प्रशांत किशोर यांनी निवडणुकीच्या रिंगणात 34 मुस्लिम उमेदवार उतरवले आहेत. तर ओवैसींच्या एमआयएम पक्षाने 25 उमेदवार उभे केले आहेत, त्यापैकी 23 उमेदवार मुस्लिम आहेत. अशा प्रकारे, मुस्लिम मतांचे विभाजन होण्याची शक्यता वाढल्याने, त्याचा थेट फटका तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील आरजेडी-काँग्रेस आघाडीला बसू शकतो.
( नक्की वाचा : OMG : कारचा आरसा लागल्याने संताप, पती-पत्नीने 2 किलो मीटर पाठलाग करत तरुणाला चिरडले; पाहा धक्कादायक Video )
सत्तेची किल्ली सीमांचलकडे
एकंदरीत, मुस्लिम मतदारांनी कोणत्या दिशेने मतदान करायचे, हा निर्णय बिहारचा भावी मुख्यमंत्री कोण असेल हे ठरवणार आहे. ओवैसी आणि प्रशांत किशोर यांच्या उमेदवारीमुळे मुस्लिम मतांचे विभाजन झाले, तर त्याचा फायदा एनडीएला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सीमांचलच्या 24 जागा आणि मुस्लिम मतदारांचा कौल, हाच तेजस्वी यादव मुख्यमंत्री बनणार की नाही, याचा अंतिम निर्णय ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world