Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांची लक्झरी बस रविवारी मध्यरात्री भीषण आगीत सापडल्याची घटना घडली. ही दुर्घटना मुंबई–गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) कशेडी बोगद्याच्या सुरुवातीस रात्री दोनच्या सुमारास घडली आहे.
लक्झरी बस कोकणाच्या दिशेने प्रवास करत असताना अचानक टायरचा मोठा आवाज होत फुटला आणि काही क्षणांतच आगीच्या ज्वाळा पसरल्या. प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टायर फुटल्यानंतरच बस पेटली असल्याचं सांगण्यात आलं आहे. आगीने काही क्षणांतच संपूर्ण बसला वेढा घातला. चालकाने तत्परता दाखवत वाहन तातडीने थांबवले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही. मात्र आग एवढी भयानक होती की, काही वेळातच बस पूर्णतः जळून खाक झाली.
नक्की वाचा - Pune Ganoshotsav: गणेश भक्तांसाठी सुरक्षा कवच! दगडूशेठ गणेश मंडळाकडून 50 कोटींचा विमा
या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस आणि खेड-महाड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र या दरम्यान मुंबई–गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हजारो भाविक कोकणाच्या दिशेने प्रवास करत असताना अशी दुर्घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या अपघातात सर्व प्रवासी सुखरूप बचावले असले तरी बस जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.