योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचाराला आता अक्षरशः पंख फुटले आहेत. उमेदवारांच्या तुकड्या रस्त्यावर उतरल्या असताना, सर्वात मोठं डोकेदुखीचं कारण ठरलं आहे ते बॅनर-पोस्टर्स लावण्यासाठी जागा मिळत नसणे. शहरातील प्रत्येक खांब, भिंत, झाड, बसशेड उमेदवारांनी ताब्यात घ्यायची तयारी ठेवली असली तरी नियमांच्या जंजाळात त्यांना अडखळावं लागत आहे. निवडणूक आयोगाचे कडक निर्देश- इमारत मालकाची ना हरकत, वैध कागदपत्रं आणि सर्वात महत्त्वाची घरटॅक्स पावती - पूर्ण न केल्याशिवाय एकाही बॅनरला परवानगी नाही. प्रचाराची अंतिम मुदत जवळ येत असताना उमेदवार भाषणांपेक्षा ‘बॅनर लावण्यासाठी जागा शोधा' या मोहीमेतच जास्त गुंतलेले दिसत आहेत.
अकोट शहरात घरटॅक्स वाढीने नागरिक त्रस्त, उमेदवारांचेही गणित बिघडलं..
अकोट शहरातील ही अडचणी इथेच थांबत नाहीत. नगरपालिकेने नुकतीच केलेली घरटॅक्स वाढ नागरिकांना संतापवणारी ठरली असून याचा थेट परिणाम निवडणूक प्रचारावरही झाला आहे. अनेकांनी घरटॅक्स वाढ ‘घरबसल्या चाललेली लूट' असल्याची तक्रार करत नाराजी व्यक्त केली आहे. याच मुद्द्यावर शिवसेना (शिंदे गट) नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार चंचल पितांबरवाले यांनी थेट न्यायालयात धाव घेत वाढीव टॅक्स रद्द करण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी घरटॅक्सच्या पावत्या द्यायला नकार दिल्याने उमेदवारांचे बॅनर्स लटकावण्याचे गणितच विस्कटले आहे. त्यामुळे प्रचाराचा वेग वाढला असला तरी परवानग्यांच्या अडथळ्यांनी मोहीम अनेक ठिकाणी ठप्प झाली आहे.
नक्की वाचा - Akola News : अकोल्यात 19 वर्षांच्या विवाहित महिलेनं घेतला गळफास, आत्महत्येमागे 'तो' संशयास्पद मुद्दा काय?
प्रत्येक पक्षाचा दावा वेगळा, परंतू बॅनर्स मात्र ‘भटकंतीवर'
यादरम्यान, हीच अडचण काँग्रेसच्या उमेदवारांनाही जाणवत असून “आम्ही निवडून आलो की टॅक्स कमी करू,” असा दावा काँग्रेस उमेदवार अलका बोडखे यांनी केला आहे. तर इतर उमेदवारही घरटॅक्स वाढीला प्रमुख मुद्दा मानून मतदारांशी संवाद साधत आहेत. पण कोणताही पक्ष असो, बॅनर-पोस्टर्स लावण्यासाठी जागा शोधणे हेच त्यांच्या मोहिमेचं मुख्य काम ठरत आहे. शहरातील बहुतेक ठिकाणी परवानगीअभावी पोस्टर्स फिरत्या अवस्थेत असून प्रचार धावत असला तरी बॅनर्स मात्र अजूनही ‘भटकंती' करत आहेत. अशा परिस्थितीत अकोट नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रचारापेक्षा जागा मिळवणं हेच मोठं आव्हान बनलं आहे.