सातारा: राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. विधानसभेचा प्रचार ऐन रंगात आल्या असतानाच साताऱ्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. साताऱ्यात ट्रंपेट या चिन्हावरून मोठा वाद निर्माण झाला असून माण खटाव मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन ओंबासे यांच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, साताऱ्यात ट्रंपेट या चिन्हावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. साताऱ्याच्या माण खटाव मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन ओंबासे यांनी त्यांच्या प्रचाराच्या चित्ररथावर ट्रंपेट म्हणजेच तुतारी अशी जाहिरात केली होती. आता मात्र जाहिरात करणारे अपक्ष उमेदवार सत्यवान ओंबासे यांच्यासह एकावर वडूज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपक्ष उमेदवार सत्यवान ओंबासे आणि संजय पोळ अशी गुन्हा दाखझालेल्यांची नावे आहेत. याबाबत वैभव पवार यांनी वडुज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा: तू चीज बडी है मस्क, मस्क! इलॉन यांच्याकडे उधळपट्टी थांबवण्याची जबाबदारी
मतदारांना आमिष दाखवून वाहनाच्या दोन्ही बाजूस डिजिटल फ्लेक्स लावून त्यामध्ये ट्रंपेट या चिन्हाचा समोर कंसात तुतारी असे लिहून स्पिकरवर ऑडिओ क्लिपमध्ये ही तुतारीचा उल्लेख केल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. माण खटाव मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रभाकर घार्गे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यांचे चिन्ह तुतारी आहे. दुसऱ्या बाजूला उमेदवार सत्यवान विजय ओंबासे हे ट्रंपेट असा शब्दप्रयोग न करता ट्रंपेट म्हणजे तुतारी असा शब्दप्रयोग करून मत मागून मतदारांची दिशाभूल करतायेत, अशी तक्रार वैभव पवार यांनी वडूज पोलीस ठाण्यात केली होती त्यावरून आता गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला ट्रंपेट चिन्हाचा मोठा फटका बसला होता. ट्रंपेट या चिन्हाचाही तुतारी असे नाव वापरल्याने शरद पवार यांच्या उमेदवारांची मते मोठ्या प्रमाणात विभागली गेली. यानंतर शरद पवार यांनी निवडणूक आयोगात धाव घेत ट्रंपेट चिन्हावर बंदी घालण्याची मागणी केली होती. निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळली होती मात्र ट्रंपेट चिन्हाचा उल्लेख तुतारी असा न करण्याचे आदेश दिले होते.
महत्वाची बातमी: 'गुंडाफुंडांच्या ताब्यात कोकण द्यायचं आहे का?' ठाकरे तळकोकणात गरजले