अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपुरात स्वतःच्या पोटच्या लेकरांचा सौदा करणाऱ्या एका निर्दयी मातेचे आणि तिच्या नराधम प्रियकराविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दोन मुलांची विक्री केल्यानंतर या महिलेने आपल्याच 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचीही विक्री करण्याचा कट रचला होता, जो पोलिसांनी उधळून लावला.
याप्रकरणी रामनगर पोलिसांनी नराधम आईसह, नवजात बाळाची खरेदी करणाऱ्या दोन महिलांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मुलीवर अत्याचार करणारा प्रियकर अजय फुलझेले हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या चौघांवरही मानवी तस्करी आणि 'पॉक्सो' अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लिव्ह-इन पार्टनरची अल्पवयीन मुलीवर नजर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर तिची ओळख अजय फुलझेले याच्याशी झाली. हे दोघेही त्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, काही दिवसांतच नराधम अजयची नजर त्या अल्पवयीन मुलीवर पडली आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला, ज्यातून ती गरोदर राहिली.
(नक्की वाचा- Pune Liquor Tragedy: विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई, 9 पोलीस अधिकारी निलंबित, नावे आली समोर)
चंद्रपुरात या पाप कर्माची वाच्यता होईल या भीतीने अजय आणि मुलीच्या आईने तिला प्रसूतीसाठी नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. तिथे रुग्णालय प्रशासनाला संशय येऊ नये म्हणून, "पूर परिस्थितीमध्ये आमची सर्व कागदपत्रे वाहून गेली" अशी खोटी कथा रचून मुलीचे वय 20 वर्षे असल्याचे सांगितले. मात्र, वैद्यकीय तपासणीदरम्यान डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी नागपूरच्या अजनी पोलिसांकडे 'एमएनसी' पाठवली. अजनी पोलिसांनी तातडीने 'झिरो एफआयआर' नोंदवत हे प्रकरण पुढील तपासासाठी चंद्रपूर पोलिसांकडे वर्ग केले.
स्वतःचीच मुले विकणारा अमानुष 'व्यवसाय'
या प्रकरणाचा तपास रामनगर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी वाकडे यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यांनी पीडित अल्पवयीन मुलीचे सविस्तर जबाब घेतले, तेव्हा त्यांना यामागे काहीतरी मोठे रॅकेट असल्याचा संशय आला.
(नक्की वाचा- Nagpur News: गॅस सिलिंडरची कटकट संपणार? कचऱ्यापासून तयार होणार 'बायोगॅस', नागपुरात देशातील पहिला प्रकल्प सज्ज)
दोन मुलांची आधीच विक्री
पोलिसांनी जेव्हा पीडित मुलीच्या आईला ताब्यात घेऊन कडक चौकशी केली, तेव्हा तिने दिलेली कबुली ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. तिने यापूर्वी स्वतःचीच दोन मुले तेलंगणा आणि स्थानिक पातळीवर प्रत्येकी दोन लाख रुपयांना विकली होती. अल्पवयीन मुलीच्या पोटी जन्माला आलेल्या या नवजात बाळाचीही ती अशाच प्रकारे विक्री करणार होती.
या धक्कादायक खुलाशानंतर रामनगर पोलिसांनी मानवी तस्करीचे कलम जोडले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बाळाची खरेदी करणाऱ्या एका महिलेला तेलंगणा राज्यातील कागजनगर येथून, तर दुसऱ्या महिलेला चंद्रपूर येथून अटक केली आहे. पोलीस आता फरार मुख्य आरोपी अजयचा शोध घेत असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे का, याचा तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world