Chandrapur Mahapalika News: चंद्रपूर महानगरपालिकेत शिवसेना (उबाठा) आणि भाजपच्या युतीने महापौर निवडल्याच्या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये परस्परविरोधी मते समोर आल्याने राजकीय संभ्रम निर्माण झाला आहे. सुषमा अंधारे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या हिताचे समर्थन केले आहे, तर संजय राऊत यांनी भाजपला मदत न करण्याची कडक भूमिका मांडली होती.
चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपच्या संगीता खांडेकर या महापौर म्हणून निवडून आल्या आहेत. मात्र, या निवडीत शिवसेना (उबाठा) गटाने भाजपला मदत केल्याच्या चर्चेने खळबळ उडाली आहे.
कार्यकर्त्यांचे हित महत्त्वाचे- सुषमा अंधारे
सुषमा अंधारे यांनी चंद्रपूरमधील स्थानिक निर्णयाचा बचाव केला आहे. त्यांनी म्हटलं की, 'स्थानिक निवडणुकांसाठी सर्वाधिकार हे त्या ठिकाणच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले होते. राजकारणात लवचिकता असणं म्हणजे सरेंडर करणे असा अर्थ नसतो. सत्ता मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे राजकारण. आमचा पहिला प्रयत्न हा काँग्रेससोबतचाच होता. काँग्रेसमधील दोन गटांमुळे गोंधळाची स्थिती होती. काँग्रेससोबत बरेच दिवस वाटाघाटी सुरू होत्या."
(नक्की वाचा- Ajit Pawar AI VIDEO: "खरंच मला करमत नाही रे इकडे..." अजितदादांच्या आवाजातील हृदयस्पर्शी AI व्हिडिओ)
"महापालिका निवडणुकीत आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढलो होतो. पक्षप्रमुखांना याची कल्पना दिली आहे, मला आहे, पक्षातील अनिल देसाईंसह सगळ्या नेत्यांना आहे. सगळ्या नेत्यांचे असे म्हणणे आहे की ती निवडणूक गिऱ्हेंनी एकहाती लढली होती. असा स्थितीत कार्यकर्त्याला सत्ता स्थापन करताना विचारात घेणं अधिक महत्त्वाचं आहे. शिवसेना कार्यकर्त्यांना बळ देणारा पक्ष आहे. स्थानिक निवडणुकांसाठी सर्व अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले होते. राजकारणात लवचिकता असणे म्हणजे शरणागती पत्करणे असा अर्थ होत नाही," अशी भूमिका देखील अंधारे यांनी मांडली.
संजय राऊत यांचा थेट इशारा
दुसरीकडे, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचा दाखला देत महापौर निवडणुकीआधीच या युतीला विरोध दर्शवला होता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, चंद्रपूरमध्ये एकवेळ विरोधी पक्षात बसणे परवडेल, पण भाजपची सत्ता येईल अशी भूमिका घेता येणार नाही. भाजपने शिवसेना फोडली असल्यामुळे कोणत्याही स्थानिक पातळीवर त्यांच्याशी हातमिळवणी करणे पक्षाच्या धोरणाबाहेर आहे, असे राऊतांनी स्पष्ट केले आहे.
(नक्की वाचा- Chandrapur News: चंद्रपुरात काँग्रेसमध्ये चिखलफेक, भाजपचं 'कमळ' फुललं; महापौरपदी संगीता खांडेकर)
चंद्रपूरमधील सत्तेचे गणित
भाजपने 32 मते मिळवून महापौर पद पटकावले आहे. ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी जर भाजपला मतदान केले असेल, तर तो उद्धव ठाकरेंच्या आदेशाचा भंग मानला जाऊ शकतो. यामुळे चंद्रपूरच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.