अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. काँग्रेसच्या अंतर्गत भांडणात भाजपने संधी साधली आहे. शिवसेना ठाकरे गटाला सोबत घेत भाजपने चंद्रपूर महापालिकेत सत्ता सत्ता स्थापन केली आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर अवघ्या एका मताने विजयी झाल्या आहेत. भाजपच्या संगीता खांडेकर 32 मते मिळवून नव्या महापौर म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला.
मतदानाचे नेमके गणित
निवडणूक प्रक्रियेत 66 सदस्यांपैकी प्रत्यक्षात पडलेली मते आणि राजकीय समीकरणे खालीलप्रमाणे राहिली.
- संगीता खांडेकर (भाजप): 32 मते (विजयी)
- वैशाली महाडोळे (काँग्रेस): 31 मते
- तटस्थ: वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक अलिप्त राहिले, तर MIM चा 1 सदस्य तटस्थ राहिला.
(नक्की वाचा- Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जारी)
उपमहापौरही भाजपचाच
महापौर पदासोबतच उपमहापौर पदावरही भाजपने आपला झेंडा फडकवला आहे. भाजपचे *दीपक सिंह रावत* हे नवे उपमहापौर म्हणून विजयी झाले आहेत. यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेवर आता पूर्णपणे भाजपची सत्ता आली आहे.
(नक्की वाचा- Big News: CM फडणवीस तातडीने दिल्ली दौऱ्यावर; NCP च्या विलिनीकरणावर मोठा निर्णय होणार?)
काँग्रेसला अंतर्गत गटबाजीचा फटका?
काँग्रेसकडे 27 नगरसेवक आणि जनविकास सेनेचे 3 असे मिळून 30 चे संख्याबळ होते. तरीही 31 व्या मतापर्यंत मजल मारूनही काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर या दोन्ही गटांमधील सुप्त संघर्ष भाजपच्या पथ्यावर पडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world