Chandrapur Municipal Corporation : राजकारण आणि साध्या अंकगणिताचा मेळ नेहमीच बसेल असे नसते, याचा प्रत्यय सध्या चंद्रपूरमध्ये येत आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत सध्या साध्या आकड्यांच्या खेळापेक्षा राजकीय डावपेच जास्त प्रभावी ठरताना दिसत आहेत.
महानगरपालिकेच्या 17 प्रभागांमधील एकूण 66 जागांची स्थिती पाहता, काँग्रेस पक्ष 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. दुसरीकडे, भाजपच्या 23 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 1 अशा एकूण 24 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. मात्र, या दोन्ही मोठ्या गटांच्या संघर्षात उद्धव ठाकरे गटाचे 6 आणि वंचित बहुजन आघाडीचे 2 अशा 8 नगरसेवकांचा गट निर्णायक भूमिकेत शिरला आहे.
जो पक्ष आम्हाला महापौर पदासाठी समर्थन देईल, आम्ही त्याच्यासोबत राहू, अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे 27 आणि 24 च्या या लढाईत हे 8 नगरसेवक किंगमेकर ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
( नक्की वाचा : Sunetra Pawar Net Worth: सुनेत्रा पवारांकडे 100 कोटींहून जास्त संपत्ती; हिरे,सोने आणि पुण्यात आलिशान फ्लॅट्स ! )
काय आहे संख्याबळाचा पेच?
काँग्रेस पक्षासाठी महापौर पदाची खुर्ची मिळवणे अद्याप कठीण दिसत आहे. विजयासाठी आवश्यक असलेला 34 हा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी काँग्रेसला बरीच कसरत करावी लागणार आहे. त्यातच खासदार प्रतिभा धानोरकर आणि विधानसभेतील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यातील अंतर्गत वाद आणि कुरघोडीच्या राजकारणामुळे पक्षाचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे.
सुरुवातीला धानोरकर यांच्याकडे 13 आणि वडेट्टीवार यांच्याकडे 14 नगरसेवक असल्याचे सांगितले जात होते, परंतु आता हे समीकरण बदलले आहे. प्रतिभा धानोरकर यांनी 27 जणांची नावे शहराध्यक्षांच्या पत्रावर गट स्थापनेसाठी दिली होती, परंतु वडेट्टीवार गटाने त्यावर आक्षेप घेतल्याने हा गट स्थापन होऊ शकला नाही. ताज्या माहितीनुसार, धानोरकर यांच्याकडील 13 पैकी 5 नगरसेवक आता वडेट्टीवार गटात सामील झाल्याचे बोलले जात आहे, ज्यामुळे वडेट्टीवार गटाचे पारडे जड झाले आहे.
( नक्की न्यूज : NCP Merger : अजित पवारांच्या प्रस्तावाला स्वपक्षातूनच विरोध, 2-3 नेते...जयंत पाटलांचा मोठा धमाका! पाहा VIDEO )
कायदेशीर पेच
महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम 1986 नुसार, एकाच राजकीय पक्षाचे दोन स्वतंत्र गट पाडता येत नाहीत, मात्र त्यांचे एकत्रीकरण करता येते. विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी प्रतिभा धानोरकर यांनी दिलेल्या 27 नावांच्या गटाची नोंदणी केली असली, तरी प्रत्यक्षात केवळ 13 लोकांनीच उपस्थित राहून सह्या केल्या आहेत. त्यामुळे हा गट अधिकृतरीत्या पूर्णत्वास आलेला नाही.
एकाच पक्षात दोन गट स्थापन करता येत नसल्यामुळे आता या प्रकरणावर राज्य सरकारकडून मार्गदर्शन मागवण्यात आले आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या गटाने या नोंदणीवर लेखी तक्रार केली असून, आता दुसरा गट कोणत्या नावाने नोंदणी करतो किंवा हे दोन्ही गट एकत्र येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हायकमांडचा निर्णय आणि निवडणुकीची धास्ती
काँग्रेसमधील हा अंतर्गत वाद आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. दिल्लीत मंगळवारी (3 फेब्रुवारी) होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर हायकमांड काय निर्देश देते, यावरच चंद्रपूरचा महापौर कोणत्या गटाचा असेल हे स्पष्ट होईल. मात्र, पक्षीय पातळीवर तोडगा निघण्यापूर्वी शासकीय पातळीवर गटाची नोंदणी कशी होते, हा मोठा प्रश्न आहे.
महापौर पदासाठीची निवडणूक 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तोपर्यंत काँग्रेसमधील हा वाद मिटला नाही, तर नगरसेवक तांत्रिक कागदपत्रे सादर करून स्वतःच्या मर्जीनुसार मतदान करण्यास मोकळे राहू शकतात. अशा परिस्थितीत काँग्रेसचे हक्काचे संख्याबळ असूनही महापौर पदाची संधी हुकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world