मनिष रक्षमवार, प्रतिनिधी
Chandrapur News: जंगलालगतच्या भागात काम करताना मृत्युशी दोन हात कसे करावे लागतात आणि वाघाच्या दहशतीखाली कर्मचारी कशा प्रकारे जीव मुठीत धरून काम करतात, याचा अंगावर काटा आणणारा थरार नुकताच समोर आला आहे. वीजवाहिनी दुरुस्तीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या समोर अचानक वाघ आला.त्यामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी या कर्मचाऱ्यांना चक्क विजेच्या पोलवरच चढून बसण्याची वेळ आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथील महावितरण उपविभागात येणाऱ्या फुलझरी गावात ही थरारक घटना घडली आहे. गावाजवळील जंगलालगत असलेल्या वीजवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची तुकडी गेली होती. कर्मचारी आपल्या कामात व्यस्त असतानाच अचानक झुडपातून एक भला मोठा वाघ बाहेर आला. वाघाला पाहताच कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली आणि सैरावैरा पळापळ सुरू झाली.
तब्बल 1 तास पोलवरच अडकले कर्मचारी
झाडावर किंवा जमिनीवर लपण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याने एका कर्मचाऱ्याने क्षणाचाही विलंब न लावता थेट विजेच्या पोलवर चढून स्वतःचा बचाव केला. तर इतर कर्मचाऱ्यांनी दूर अंतरावर सुरक्षित जागा गाठली. वाघ पोलच्या अगदी खाली आणि आजूबाजूच्या परिसरात घिरट्या घालत होता. त्यामुळे पोलवर चढलेला कर्मचारी तब्बल 1 तास वरच ताटकळत अडकून राहिला.
( नक्की वाचा : Poisonous Snakes पावसाळा सुरू होताच जमिनीखालून बाहेर पडतात 'हे' 4 यमदूतासारखे साप, वाचा कसा करणार स्वत:चा बचाव )
वाघ निघून गेल्यानंतर सुटकेचा निश्वास
जवळपास 1 तास परिसरात वावरल्यानंतर वाघ हळूहळू जंगलाच्या दिशेने निघून गेला. वाघ दृष्टीआड झाल्याची खात्री पटल्यानंतर आणि इतर सहकाऱ्यांनी इशारा दिल्यानंतरच कर्मचाऱ्याने सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर थांबलेले काम पूर्ण करून तो कर्मचारी सुरक्षितपणे खाली उतरला.
Chandrapur | वाघ आला पळा, पळा... वाघाच्या भीतीने 1 तास पोलवरच अडकले महावितरणाचे कर्मचारी; पाहा VIDEO | NDTV मराठी
— NDTV Marathi (@NDTVMarathi) July 25, 2026
चंद्रपूर जिल्ह्यातील फुलझरी गावात महावितरण कर्मचाऱ्यांसमोर अचानक वाघ आल्याने एकच खळबळ उडाली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी विजेच्या पोलवर चढून तब्बल एक तास… pic.twitter.com/N6YGL7aWyf
व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
या संपूर्ण थराराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चंद्रपूरच्या जंगल परिसरात काम करणाऱ्या वनविभाग, महावितरण आणि इतर कर्मचाऱ्यांना दररोज अशाच प्रकारे वाघाच्या दहशतीचा सामना करावा लागतो. या घटनेनंतर जंगलालगत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world