अमोल पाटील, प्रतिनिधी
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत मोठी आणि रहस्यमय बातमी समोर येत आहे. शहरालगतच्या मिटमिटा डोंगर परिसरात एका ३० फूट खोल घळीचा शोध लागला आहे. या शोधामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी प्राचीन लोखंडी नाणी आणि काही अवशेषही सापडले आहेत. ही घळ म्हणजे एखादी गुप्त भुयारी जलप्रणाली आहे की इतिहासातील दडलेला एखादा नवा अध्याय? पाहूया यावरचा हा विशेष रिपोर्ट.
डोंगराच्या कुशीत सुमारे ३० फूट खोल एक विस्तीर्ण घळ
छत्रपती संभाजीनगर... लेण्यांच्या आणि इतिहासाच्या खुणा जपणारं शहर! पण आता या शहराच्या उंबरठ्यावर असलेल्या मिटमिटा डोंगर परिसरात एक असं रहस्य समोर आलंय, ज्याने इतिहास अभ्यासकांचीही झोप उडवली आहे. डोंगराच्या कुशीत सुमारे ३० फूट खोल एक विस्तीर्ण घळ आढळून आली आहे. वरून पाहता सामान्य वाटणारी ही जागा आतून मात्र इतिहासाच्या अनेक खुणा साठवून असल्याचं बोललं जातंय. या ठिकाणी काही जुनी लोखंडी नाणी आणि प्राचीन अवशेष सापडल्याने या जागेचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे.
जुनी जलप्रणाली की ऐतिहासिक भुयार...
तज्ज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार, ही घळ म्हणजे प्राचीन काळातील एखादी अंडरग्राउंड वॉटर सिस्टीम म्हणजेच भुयारी जलवाहिनी असू शकते. औरंगाबादचा (छत्रपती संभाजीनगर) इतिहास हा नहरींसाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे ही घळ त्याच यंत्रणेचा भाग आहे का, असा प्रश्न उपस्थित होता. मिटमिटा परिसरात सापडलेली ही घळ अत्यंत महत्त्वाची आहे. या ठिकाणी सापडलेली लोखंडी नाणी आणि बांधकामाची पद्धत पाहता, याचा संबंध एखाद्या विशिष्ट कालखंडाशी असू शकतो. सखोल उत्खनन आणि अभ्यासानंतरच यातील नेमकं सत्य बाहेर येईल. निश्चितच, मिटमिटा डोंगरातील हे गूढ आता प्रशासनाच्या आणि पुरातत्व विभागाच्या हाती आहे. जर ही एखादी जुनी जलप्रणाली किंवा ऐतिहासिक भुयार असेल, तर छत्रपती संभाजीनगरच्या शिरपेचात आणखी एक ऐतिहासिक मानाचा तुरा रोवला जाईल. पण तोपर्यंत या ३० फूट खोल घळीचं रहस्य कायम आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world