Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमधून एक भयंकर घटना समोर आली आहे. संभाजीनगरच्या शिंदे फाटा परिसरात एका तरुणावर अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी वार केल्याचे समोर आले आहे. या मारहाणीत सीताराम आसाराम आळंजकर हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. धक्कादायक म्हणजे हल्लेखोरांनी तरुणाच्या गुप्तांगावर वार करत कापण्याचा प्रयत्न केला आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तरुणावर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला
याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर-लासूर मार्गावरील शिंदेवाडी फाटा परिसरात शनिवारी रात्री एका ३२ वर्षीय तरुणावर अज्ञातांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. हल्लेखोरांनी तरुणाला रस्त्यावरून निर्जनस्थळी नेऊन त्याच्या गुप्तांगावर वार करून गंभीर जखमी केले. सीताराम आसाराम आळंजकर जखमी व्यक्तीचे नाव आहे.
आळंजकर यांना सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास लासूर मार्गावरील शिंदेवाडी फाटा येथील एका शाळेजवळ अज्ञात हल्लेखोरांनी रस्त्याशेजारील एका निर्जन शेतात नेले. तेथे त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवत त्यांच्या गुप्तांगावर गंभीर वार केले. त्यानंतर आरोपींनी जखमी सीताराम यांना पुन्हा रस्त्यावर आणून सोडले आणि तिथून पळ काढला. या घटनेनंतर जखमी सीताराम घटनास्थळी बराच वेळ विव्हळत होता.
दरम्यान, याबाबत माहिती मिळताच सीताराम यांचा चुलत भाऊ लक्ष्मण आळंजकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सीताराम यांना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरापर्यंत पोलिसात या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.
साईनगर परिसरात गोळीबाराची घटना
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगरच्या एन-६ सिडको परिसरातील साईनगर येथे शनिवारी रात्री उशिरा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. ३१ वर्षीय समीर नाईक या तरुणाच्या राहत्या घरातच ही घटना घडली असून, त्याच्या कानाजवळून डोक्याच्या आरपार गोळी गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. प्राथमिक तपासानुसार, समीरने स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
Ashok Kharat : कवितेतून टाकायचा महिलांवर जाळं? भोंदूबाबा अशोक खरातची ही बाजू पाहून चक्रावून जाल!
समीर हा आपल्या आई आणि लहान भावासोबत साईनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. त्याची आई बजरंग चौकात बांगड्यांचे दुकान चालवते, तर समीर पौरोहित्याचे काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. घटनेच्या दिवशी सायंकाळी आई दुकानात गेल्यानंतर समीर घरी एकटाच होता. काही वेळाने लहान भाऊ घरी परतला असता, समीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या शेजारी पिस्तूलही आढळून आले. हा प्रकार पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.