Chhatrapati Sambhajinagar News: पैठण येथील संत एकनाथ महाराज षष्ठी महोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच, आज सकाळी गोदावरी पात्रात एक दुर्दैवी घटना घडली. सिल्लोड तालुक्यातील एका ६० वर्षीय वारकऱ्याचा पवित्र स्नानासाठी उतरलेला असताना बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे वारकरी संप्रदायात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गोदावरी नदीत बुडून वारकऱ्याचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील श्री क्षेत्र मुक्ताई संस्थान (हाळदा) येथील दिंडी पैठणमध्ये दाखल झाली होती. या दिंडीतील वारकरी बाबुराव रुद्राजी बगळे (वय ६०) हे आज, १० मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पात्रात स्नानासाठी उतरले होते. मात्र, नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पात्रात ओढले गेले. सोबत असलेल्या इतर वारकऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि आरडाओरडा केला, परंतु पाण्याचा प्रवाह आणि खोलीमुळे ते क्षणार्धात दिसेनासे झाले.
घटनेची माहिती मिळताच पैठण येथील बंदोबस्तावर असलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने धाव घेतली. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्र अधिकारी विजय राठोड, जवान मच्छिंद्र जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर बगळे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. नाथषष्ठीसाठी लाखो भाविकांची गर्दी होत असताना प्रशासनाने नदीपात्रातील सुरक्षेबाबत अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
Bhandara News: पालकांची भीती, 12 वर्षांच्या मुलाने रचला अपहरणाचा बनाव; नेमकं काय झालं?