राहुल वाघ, नाशिक:
Nashik Dr. Manisha Jejurkar Death Case: नाशिक येथील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्या प्रकरणात आता नवनवे खुलासे होत आहेत. याप्रकरणात मनीषा जेजुरकर यांच्या नातेवाईकांनी त्यांचे पती डॉ. निलेश जेजुरकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. निलेश जेजुरकर यांचे विवाहबाह्य संबंध होते, त्यांच्याकडून मनीषा यांचा छळ सुरु होता. त्यामुळे ही आत्महत्या नसून घातपात असावा, असा संशय मनीषा यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.
मनीषा जेजुरकर यांची हत्या की आत्महत्या?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. मनीषा जेजुरकर यांची नेमकी हत्या की आत्महत्या? अशी शंंका उपस्थित करत नातेवाईकांनी गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. "ज्या प्रकारे त्यांचा मृतदेह आढळून आला, तो खिडकीला लटकलेल्या अवस्थेत होता. खिडकीला लटकून कोणी आत्महत्या करतं का? तसेच अशावेळी दोरीची लांबी कमी असावी, मात्र या प्रकरणात आढळलेल्या दोरीची लांबी जास्त आहे, अशा लांब दोरीने कशी आत्महत्या करता येईल," असा सवाल मनीषा जेजुरकर यांच्या भगिनी हर्षदा रसाळ यांनी विचारला आहे.
तसेच "डॉ. निलेश जेजुरकर यांचे डॉ. स्वाती चव्हाण हिच्याशी विवाहबाह्य संबंध होते. याची कल्पना मनीषा जेजुरकर यांना आली होती. त्यांनी याबाबत विचारणाही केली होती, तेव्हा तिचा आवाज दाबण्यात आला. डॉ. स्वाती दोषी नसतील तर त्या फरार का आहेत? त्यांचा काही दोष नसता तर त्या फरार झाल्या नसत्या. त्यामुळे पोलिसांनी याबाबत सखोल तपास करावा," अशी मागणीही कुटुंबियांनी केली आहे.
पोस्टमार्टम रिपोर्टवर संशय!
सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉ. निलेश आणि डॉ. स्वाती हे दोन्ही जिल्हा रुग्णालयात कार्यरत असल्याने मनीषा यांच्या शवविच्छेदन अहवालावर (Post-Mortem Report) नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. मनीषा जेजुरकर यांचे शवविच्छेदन रिपोर्ट्स बदलण्यात आलेत का? याबाबतही पोलिसांनी तपास सरावा, असं कुटुंबियांचे म्हणणे आहे. पोलिसांनी निष्पक्षपातीपणे करावा आणि सत्यापर्यंत पोहोचून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी रसाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world