Chhatrapati Sambhajinagar Don Baba Farzan: १९८६ आणि १९८८ च्या छत्रपती संभाजीनगरातील दंगलींनी जेव्हा संपूर्ण शहर होरपळून निघालं होतं, तेव्हाच अंडरवर्ल्डमध्ये एका नव्या नावाचा उदय झाला. ते नाव होतं फर्दुन अर्देसर दोरडी... पुढे ज्याला संपूर्ण शहर 'बाबा फर्जन' म्हणून ओळखू लागलं. पण फर्दुन दोरडीला 'बाबा फर्जन' हे नाव कसं मिळालं? तो नेमका कोण होता? आणि छत्रपती संभाजीनगरच्या गुन्हेगारी विश्वात त्याचा दबदबा कसा निर्माण झाला? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.
बाबा फर्जनची A टू Z कहाणी
१९८६ आणि १९८८ च्या दंगलीत बाबा फर्जन नाव चर्चेत आले, स्थानिक गुंडांशी झालेल्या वादानंतर फर्जन या दंगलींमध्ये थेट सक्रिय झाला. याच काळात त्याने स्वतःची प्रतिमा एक 'हिंदू नेता' म्हणून पद्धतशीरपणे समोर आणली. पण या प्रतिमेच्या मागे लपला होता एक सराईत गुन्हेगार, सिटीचौक आणि सिडको पोलीस ठाण्यात त्याच्यावर हत्येचा प्रयत्न करणे, अपहरण आणि जीवघेणी मारहाण करणे यासारखे तब्बल ४ गंभीर गुन्हे दाखल होते. कायद्याला आणि पोलिसांना थेट आव्हान देणारा हा एक काळ होता.
पण १९९० च्या दशकात फर्जनने आपली रणनीती बदलली आणि त्याने आपला मोर्चा कामगार संघटनांकडे वळवला. इथेच तो बड्या उद्योजकांच्या संपर्कात आला. कामगार चळवळीत सहभागी होऊन त्याने वेगवेगळ्या कंपन्यांमधील कामगार युनियन आणि मालकांमधील मध्यस्थी घडून आणल्या. अनेकदा आंदोलने मोडून काढणे, मजुरांना धमकावणे या जोरावर त्याने स्वतःची कामगार चळवळ मोठी केली. त्यानंतर एका बड्या उद्योजकाने त्याला 'बाबा' हे टोपणनाव दिले, जे पुढे त्याची ओळख बनले.
गुन्हेगारी आणि कामगार जगतात दहशत निर्माण करणाऱ्या बाबा फर्जनला पतंग उडवण्याचा एक अजब नाद होता. संभाजीनगर शहरातील हनुमान टेकडी परिसरात तो स्वतः पतंग उडवण्याच्या मोठ्या स्पर्धांचे आयोजन करायचा. जेव्हा 'बाबा' मैदानावर उतरायचा, तेव्हा त्याच्या भोवती स्थानिक तरुणांचा गराडा पडायचा. पुढे यातून त्याची तरुणांमध्ये क्रेझ वाढली...
१९८६ च्या दंगलीत त्याच्या घरावर काही लोकांनी हल्ला केला. यावेळी फर्जनने लोटा कारंजात छऱ्यांची बंदूक काढत फायरिंग केली. या दंगलीत त्याला अटकही झाली होती. पुढे बाबाने वर्ष १९९० मध्ये राजकारणात आपले नशीब आजमावले. विधानसभा निवडणुकीत खैरे यांच्या विरोधात शड्डू ठोकला. यात अपयश आले. पठाणी ड्रेस, आवाजातला करारीपणा यामुळे त्या काळात शहरात डॉन म्हणून परिचित होता. हळूहळू त्याने आपली कामगार युनियनसह राजकारणापासून दूर झाल्याचेही त्यांनी सांगितले.
कामगार नेता ते डॉन..
कामगार नेता म्हणून मिरवणाऱ्या फर्जनची शहरातील अनेक नामवंत उद्योजक, ३ बड्या कंपन्यांचे एचआर आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत थेट ऊठबस होती. त्यामुळे बड्या साहेबांशी संधान साधण्यात तो पटाईत होता. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, त्याला मिळालेल्या महागड्या भेटवस्तू, तत्कालीन नामांकित कंपन्यांची गोपनीय पत्रे, पैशांनी गच्च भरलेली बंद पाकिटे आणि बॅगा आज सोन्याच्या अंड्यासारख्या जुनाट अवस्थेत सापडल्या आहेत. महिन्याभरापूर्वी या तथाकथित डॉनचे निधन झाले आणि त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरावर छापा मारला... या कारवाईनंतर पुन्हा एकदा बाबा फर्जन नाव चर्चेत आले.