​​Chhatrapati Sambhajinagar : गोवंश तस्करांविरोधात सर्वात मोठी कारवाई; पोलिसांचं थेट सर्जिकल स्ट्राईक

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी गोवंश तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

​Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी गोवंश तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. चोरट्या मार्गाने गोवंशाची तस्करी करणारी टोळी, बेकायदेशीर कत्तलखाने आणि गोमांस विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी थेट ‘सर्जिकल स्ट्राईक' केला आहे. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या आदेशानंतर संपूर्ण जिल्ह्यात तस्करांचे धाबे दणाणले असून, अनेक मोठे तस्कर आता भूमिगत झाले आहेत. पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याचा प्रचंड वचक निर्माण झाला आहे.

​RTO चा दणका; लायसन्स थेट रद्द...

​केवळ गुन्हे दाखल करून पोलीस थांबलेले नाहीत, तर तस्करांच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांनी तब्बल १९ वाहन आणि चालकांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव आर.टी.ओ. कडे पाठवला होता. यावर तत्काळ कारवाई करत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ५ वाहनांचे परवाने ३० दिवसांसाठी निलंबित केले आहेत. तर ६ चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स थेट ९० दिवसांसाठी रद्द केले आहेत. इतर जिल्ह्यांतील वाहनांवरही अशीच कठोर कारवाई करण्यासाठी संबंधित आर.टी.ओ. कार्यालयांकडे प्रस्ताव पाठवण्यात आले असून, यापुढे अशा वाहनांना रस्त्यावर फिरू न देण्याचा कडक इशारा पोलिसांनी दिला आहे.

Advertisement

​१० दिवसांत २४ गुन्हे, ४४ आरोपी गजाआड...

​१६ मे ते २६ मे या अवघ्या १० दिवसांच्या कालावधीत ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात छुप्या मार्गांवर कडक नाकाबंदी, गस्त आणि सुनियोजित छापे टाकून तस्करांना जेरबंद केलं. वैजापूर, गंगापूर, पैठण, कन्नड, सिल्लोड, फुलंब्री, करमाड यांसह अनेक पोलीस ठाण्यांच्या विशेष पथकांनी अत्यंत धाडसी कामगिरी केली. या १० दिवसांत २४ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल ४४ आरोपींना निष्पन्न करून त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम, भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मोटर वाहन अधिनियमांतर्गत सक्त कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

नक्की वाचा - Sambhajinagar : वर-वधूंनी गावातील 3500 शेतकऱ्यांच्या सुरक्षेची बांधली गाठ; मराठवाड्यातील लग्नाची जोरदार चर्चा

​१११ जनावरांची मुक्तता; ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त...

​तस्करांनी कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत निर्दयीपणे आणि क्रूरतेने डांबून ठेवलेली १११ जनावरे पोलिसांनी छाप्यादरम्यान सुखरूप सोडवली. यामध्ये छुप्या ठिकाणी डांबलेली ४२ आणि वाहनांमध्ये कोंबलेली ६९ जनावरे समाविष्ट आहेत. या सर्व जनावरांची (किंमत ३३ लाख ९९ हजार २०० रुपये) मुक्तता करून त्यांची रवानगी अधिकृत गोशाळांमध्ये करण्यात आली आहे. या संपूर्ण मोहिमेत पोलिसांनी ४४ आरोपींकडून १११ जनावरांसह १,९४५ किलो गोमांस आणि वाहने असा एकूण ५५ लाख ४६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

​पोलीस अधीक्षकांचे जाहीर आवाहन!

​पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणीही कायदा हातात घेऊ नये. गोवंश जनावरांची अवैध वाहतूक किंवा कत्तल होत असल्यास नागरिकांनी तत्काळ स्थानिक पोलीस ठाणे, पोलीस नियंत्रण कक्ष (0240-2381633) किंवा 'डायल ११२' वर संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल आणि तस्करांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.