जाहिरात

Sambhajinagar : एका विहिरीवर अख्ख्या गावाचा 'श्वास'; डोळ्यात पाणी आणणारं संभाजीनगरचं भयाण वास्तव

गावात सिमेंटचे रस्ते झाले, आधुनिक इमारती उभ्या राहिल्या, गावाने भौतिक प्रगतीची शिखरं गाठली; मात्र निसर्ग कोपला.

Sambhajinagar : एका विहिरीवर अख्ख्या गावाचा 'श्वास'; डोळ्यात पाणी आणणारं संभाजीनगरचं भयाण वास्तव

Chhatrapati Sambhajinagar : ​छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील काही भागात मे महिन्याच्या सुरुवातीपासून भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. अडुळ तांडा येथील परिस्थिती तर अत्यंत भयावह झाली आहे. गावातील पाण्याचे मुख्य स्त्रोत असलेले बोअरवेल आणि सार्वजनिक विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. पाण्याचा एक थेंबही मिळत नसल्याने संपूर्ण तांडा तहानेनं व्याकूळ झाला आहे. गावातील सर्वच स्त्रोत आटलेले असताना, केवळ एका विहिरीत थोड्याफार प्रमाणात पाणी शिल्लक आहे. मात्र, हे पाणी मिळवण्यासाठी अख्ख्या गावाची या विहिरीवर झुंबड उडत आहे.

पहाटेचा गारवा असो वा दुपारचे रणरणते ऊन, या एका विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिला, लहान मुले आणि वृद्धांची मोठी गर्दी पाहायला मिळते. आपल्या हंड्यात चार तांबे पाणी आधी कसे पडेल, यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. पायाखाली तापलेली जमीन आणि अंगाची लाहीलाही करणारे ऊन, अशा परिस्थितीतही येथील महिलांना पाण्यासाठी मैलोन् मैल पायपीट करावी लागत आहे. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही प्रशासकीय पातळीवर अद्याप कोणतीही ठोस हालचाल दिसत नाही. टँकरची प्रतीक्षा आता वेदनादायी ठरत असून, अडुळ तांड्याचा हा पाण्याचा वनवास नेमका कधी संपणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


पाणी टंचाईचं भीषण वास्तव... ५ रुपये हंडाभर पाणी!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुका एरवी जायकवाडी धरणामुळे ओळखला जातो. मात्र याच तालुक्यातील अडुळ खुर्द गावात सध्या भीषण जलसंकट उभं राहिलं आहे. गावातील विहिरींनी तळ गाठल्याने आणि पाण्याचे नैसर्गिक स्रोत पूर्णपणे आटल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ आली आहे. अडुळ खुर्दमध्ये आता पाण्याची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, गरिबांनाही पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. गावात हंडाभर पाण्यासाठी ५ रुपये मोजावे लागत असून एका ड्रमसाठी ५० रुपयांची मागणी केली जात आहे. मराठवाड्यात आतापासून अशी परिस्थिती जाणवत असल्याने, भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. 

नक्की वाचा - Mumbai News : चौघांचा मृत्यू, कलिंगडाची विक्री घटली; कलिंगडामुळे जीव जाऊ शकतो का? आहारतज्ज्ञांनी केलं अलर्ट

अब्दुलपूर तांड्यात भौतिक प्रगती मात्र निसर्गाचा कोप 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अब्दुलपूर तांडा आज विकासाच्या दुहेरी कात्रीत सापडला आहे. गावात सिमेंटचे रस्ते झाले, आधुनिक इमारती उभ्या राहिल्या, गावाने भौतिक प्रगतीची शिखरं गाठली; मात्र निसर्गाच्या कोपाने आणि नियोजनाच्या अभावाने या चकचकीत रस्त्यांवर आता पाण्यासाठी घागरी रिकाम्या लोळत आहेत. गावाचा कायापालट झाला असला तरी, पिण्याच्या पाण्यासाठी मात्र गावकरी आजही तहानलेलेच आहेत. विकासाची ही 'झळाळी' भीषण पाणीटंचाईपुढे फिकी पडली आहे. 

गावाची लोकसंख्या अकराशेच्या पार आहे, पण प्रशासनाने या अवाढव्य लोकसंख्येसाठी पाठवलेला मदतीचा हात म्हणजे केवळ एक टँकर, ११०० लोकांची तहान भागवण्यासाठी एक टँकर म्हणजे समुद्रात थेंब टाकण्यासारखा प्रकार झाला आहे. प्रशासकीय दरबारी गावाची नोंद विकासाच्या नकाशावर असली, तरी जमिनीवरची परिस्थिती भयावह आहे. अब्दुलपूर तांड्यातील परिस्थिती पाहायची असेल तर इथल्या घरांच्या उंबरठ्याकडे नजर टाका. प्रत्येक घरासमोर ३ ते ४ पाण्याचे प्लास्टिक ड्रम आणि रिकाम्या टाक्यांचा खच पडलेला दिसतो. हे ड्रम म्हणजे इथल्या भीषण टंचाईचे मूक साक्षीदार आहेत. टँकर कधी येईल आणि आपल्याला दोन घागरी पाणी कधी मिळेल, याची चातकासारखी प्रतीक्षा करताना गावकरी दिवसभर या ड्रमच्या राखणीला बसलेले असतात. एक वेळचं जेवण मिळालं नाही तर चालेल, पण घशाला कोरड पडू देऊ नका, अशा संतप्त आणि हताश भावना इथल्या महिलांनी व्यक्त केल्या आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com