संभाजी राजे फक्त एकाच धर्माच्या अतिक्रमणाच्या विरोधात आहेत? पोलीस स्टेशन बाहेर उभे राहून दिले आरोपांना उत्तर

आंदोलनातील कार्यकर्त्यांची विशाळगड परिसरातील अतिक्रमण हटाव ही भूमिका होती. यासाठी रविवारी मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते जमलेले होते.

Advertisement
Read Time: 3 mins
कोल्हापूर:

विशाळगडावरील अतिक्रमणांविरोधात संभाजी राजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रविवारी संभाजी राजे छत्रपती या अतिक्रमणांविरोधात आक्रमक भूमिका घेत विशाळगड परिसरात पोहोचले होते. तुफान पाऊस असतानाही संभाजी राजे आणि त्यांचे कार्यकर्ते मागे हटण्यास तयार नव्हते. यामुळे पोलिसांचीही चांगलीच दमछाक झाली होती. संभाजी राजे छत्रपती आणि रवींद्र पडवळ यांच्या नेतृत्वाखाली या अतिक्रमणाविरोधात आंदोलनाला सुरुवात झाली होती.आंदोलनातील कार्यकर्त्यांची विशाळगड परिसरातील अतिक्रमण हटाव ही भूमिका होती. संभाजी राजे यांचे हे आंदोलन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या आरोपांवर संभाजी राजे यांनी मौन सोडले आहे. 

सोमवारी संभाजी राजे हे कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातल्या शाहूवाडी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यांच्याविरोधात दाखल गुन्ह्याबाबत माहिती घेण्यासाठी ते पोहोचले होते. पोलीस अधिकाऱ्यांना गुन्ह्याबाबत विचारले असता त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही असे संभाजी राजे यांनी सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर पत्रकारांशी बोलताना संभाजी राजे यांनी म्हटले की, "विशाळ गडावर पहिल्यांदा जर कोणाचे अतिक्रमण झाले असेल तर ते प्रकाश पाटील, वेल्हाळ यांचे आहे. विशाळ गडावरील पहिली दोन अतिक्रमणे काढण्यात आली आहे ती हिंदू समाजाची आहे. हिंदू मुस्लिम रंग  देण्याचा जे प्रयत्न करत आहेत हा तसा विषय नाही. विशाळगडावरील ज्यांनी अतिक्रमण केली त्या सगळ्यांची अतिक्रमणे काढली पाहिजे." 

Advertisement

संभाजी राजे यांनी म्हटले की, "शाहू महाराजांनी दोन भूमिका घेतल्या आहेत. पहिली म्हणजे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना सांगितलं होतं की संभाजीराजेंची मिटींग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत, गृहमंत्र्यांसोबत लावावी. हा प्रश्न वरिष्ठ पातळीवर सुटू शकतो. ही चर्चा झाली नाही, मला चर्चेला बोलावले नाही. दुसरी भूमिका होती ती म्हणजे संभाजीराजे आक्रमक होते, अशावेळी तिथे जे घडलं त्याचं मी समर्थन करत नाही. माझे ते वडील आहेत, कोल्हापूरचे खासदार आहेत. ते महाराज आहे, ते सर्वांचे महाराज आहे. त्या नात्याने त्यांनी भूमिका मांडली त्यामुळे ही भूमिका मी स्वीकारतो. मला त्यांना विनंती करायची आहे की माझी भूमिका काय होती ती खासदार म्हणून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना विचारावी. मी आक्रमक असल्याचे मला वाईट वाटत नाही. विशाळगडाने शिवाजी महाराजांचे, स्वराज्याचे रक्षण केले होते. या विशाळगडासाठी मी आक्रमक झालो असेल तर मला त्याचा अभिमान आहे."

Advertisement

रविवारी काय घडले 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी राजे छत्रपती आणि रवींद्र पडवळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनातील कार्यकर्त्यांची विशाळगड परिसरातील अतिक्रमण हटाव ही भूमिका होती. यासाठी मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते जमलेले होते. अनेक शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देखील दिल्या. त्याचबरोबर काहींनी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या.दुपारी बाराच्या सुमारास जमावाने आक्रमक भूमिका घेतली. गजापूर परिसरात दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये अनेक घरांचे नुकसान झालं. या परिसरातील दुकानांची तोडफोड करण्यात आली. काही वाहनांवर दगड घालण्यात आले होते. दरम्यान एका जमावाने काही सिलेंडर गोळा करत आग देखील लावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. काही घरांमधल्या वस्तू बाहेर फेकण्यात आल्या. या परिसरात काही जण घरामध्ये अडकून पडले होते. संतप्त जमावासमोर प्रत्येकजण हातबल झालेला होता.

Advertisement