संजय तिवारी, प्रतिनिधी
Chhatrapati Shivaji Maharaj : भारताच्या इतिहासातील महान योद्धा आणि कुशल प्रशासक छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा 395 वी जयंती साजरी करीत आहोत. महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. स्वराज्यासाठी महाराजांनी मुघलांना जेरीस आणलं. त्यांची प्रतिमा इतकी अफाट होती की त्यांच्या नावाने मुघल थरथर कापायचे. अत्यंत चाणाक्ष बुद्धी, निडर, जबरदस्त युद्ध नियोजन, मुत्सद्दीपणा, जनतेला सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि सामर्थ्य असलेल्या छत्रपतींनी स्वराज्यासाठी स्वत:च्या रक्ताचं पाणी केलं. गड-किल्ले, वाघनखे, भवानी तलवार, हस्तलिखितं, दुर्मीळ अशा ऐतिहासिक पत्रांमधून आज महाराजांचं कर्तृत्व लक्षात येतं. यातच एक महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे सुवर्णमुद्रा किंवा होनं. आज या होन फारशा उपलब्ध नसल्या तरी महाराजांच्या राज्यभिषेकाच्या आदल्या दिवशी चलनात आलेल्या या होनचं ऐतिहासिक महत्त्व आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
होनची निर्मिती कधी झाली?
सुवर्णमुद्रा किंवा होन राजगडावर खास कार्यक्रमासाठी तयार करण्यात आली होती. 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्यभिषेकानिमित्ताने ही मुद्रा तयार करण्यात आली. त्यावेळी तीन ग्रॅमची मुद्रा तयार करण्यात आली. राज्यभिषेकादिवशी महाराजांची सुवर्ण तूला करण्यात आली होती. त्यावेळी एक इंग्रज प्रतिनिधी रायगडावर हजर होता. त्याने लिहून ठेवलेल्या माहितीनुसार, महाराजांची सुवर्ण तूला करण्यात आली होती. त्यावेळी महाराजांचं वजन 150 पौंड होतं. महाराजांची 16,000 होन सुवर्ण होनची तूला करण्यात आली होती. हे सर्व होन महाराजांनी आलेल्या सर्व पाहुणे, सरदार यांना भेट म्हणून दिले होते. विशेष म्हणजे गागा भट यांना तब्बल साडे सात हजार होन देण्यात आले होते, अशी माहिती इतिहास संशोधक आणि शिवकालीन नाण्यांचे अभ्यासक अशोक सिंग ठाकूर यांनी दिली आहे.
नक्की वाचा - (Shiv Jayanti 2025 : महाराजांचं जबरदस्त व्यवस्थापन; सैनिकांना पगार, प्रतिपदेच्या पहिल्या दिवशी बोनसही!)
महाराजांच्या हस्तस्पर्शाने पावन झालेले सुवर्ण होन...
सध्या भारतात शिल्लक राहिलेल्या होनला शिवाजी महाराजांचा स्पर्श असल्याचं म्हटलं जातं. शिवराज्याभिषेकापूर्वी महाराजांची सुवर्ण तूला करण्यात आली होती. खास त्यासाठी सुवर्ण होनची निर्मिती करण्यात आली होती. सुवर्ण तूला नंतर स्वतः महाराजांनी आपल्या हातांनी वेगवेगळ्या पाहुण्या आणि साथीदारांना त्यांच्या दर्ज्याप्रमाणे सुवर्ण होन दिले होते. त्यामुळे, या सुवर्ण नाण्यांना त्यांचा पवित्र स्पर्श झाला आहे, असं म्हटलं जातं.
महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागानुसार सध्या भारतात 11 ते 12 होन शिल्लक आहेत, असं अशोक सिंग ठाकूर सांगतात. या होनच्या अग्रभागावर श्री राजा शिव लिहिलं असून पृष्ठभागावर छत्रपती लिहिण्यात आलं आहे. सध्या मुंबई, अहमदाबाद येथे महाराजांच्या काळातील होन पाहायला मिळतात. ही अमूल्य धरोवर असून खूप कमी जणांकडे पाहायला मिळते.
होन नष्ट कसे झाले?
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज सिंहासनावर बसले. त्यानंतर मुघलांचा प्रभाव वाढला. शिवाजी महाराजांचे होन पुढे सुरू राहू नये या भीतीने मुघलांनी ही नाणी मिळेल तिथून जप्त करून त्यांना वितळवून सोने काढून घेतलं. औरंगजेबाने दिसेल तिथून ही नाणी जमा करून वितळवण्यास सुरुवात केली. याशिवाय ज्यांच्याकडे ही नाणी आढळेल त्यांना दंड केले जाऊ लागले. सोलापूरमधील औरंगजेबाची मोहोर ही होन वितळवून तयार करण्यात आल्याचं म्हटलं जातं.