
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 : छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती साजरी करताना त्यांच्या दूरदृष्टीचे अनेक प्रसंग आजही पाहायला मिळतात. त्याकाळातही शिवाजी महाराजांचा गौरव हा केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही करण्यात आला होता. महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हा त्या काळात लंडन गॅझेटच्या पहिल्या पानावर त्यांची बातमी छापून आली होती. प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याच काळी ग्लोबल झाले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
17 व्या शतकात बरेच परदेशी पर्यटक भारतात आले होते. कोणी धर्मप्रसारासाठी, कोणी फिरायला , कोणी अधिकारी म्हणून इथं येत होते. कॉस्मो द गार्ड हा मार्मुगोवाला राहायला होता. शिवाजी महाराजांबद्दल त्याच्या कानावर काही ना काही पडत होतं. त्यामुळे तो उत्सुकतेने इथे आला होता. लोकांशी चर्चा करत त्याने शिवचरित्र लिहिलं आहे. छत्रपतींच्या निधनानंतरच हे पहिलं शिवचरित्र म्हणता येईल. 1695 मध्ये ते लिहिलं गेलेलं आहे. त्यानंतरचा शिवभारत हा ग्रंथ अफजल खानच्या वधापर्यंतच येऊन थांबतो. तो महाराजांच्या आज्ञेनेच लिहिला गेला होता. महाराजांच्या आयुष्यातील ठळक गोष्टी या पोर्तुगीज व्यक्तीने लिहून ठेवलेल्या आहेत. भारतातील पोर्तुगीज लोकांमध्ये ते प्रसिद्ध झालं होतं.
इंग्रजांचा अधिकारी हेन्री ऑक्झिंटन हा राज्याभिषेकावेळी उपस्थित होता. तो डायरी लिहायचा. त्यात त्याने महाराजांबद्दल वर्णन केलं आहे. शिवाजी महाराज इंग्रजांना शत्रूच मानत होते आणि त्यांच्याशी अंतर राखून होते. महाराजांनी राजापूर आणि हुबळीची वखार लुटली होती. त्याची भरपाई द्या म्हणून इंग्रज मागे लागले होते. थॉमन निकल्स नावाचा अधिकारी त्यासाठी राज्याभिषेकाच्या एक वर्ष आधी रायगडावर आला होता. त्याने लिहिलंय की, रायगड उंच आणि अभेद्य आहे. या निकल्सने लिहिलंय की, पुरेशा साठ्यानिशी हा गड लढवला तर संपूर्ण जगाविरूद्ध लढता येईल.
नक्की वाचा - Shivaji Maharaj : राज्यभिषेकावेळी महाराजांची केली होती सुवर्ण तूला, या 16,000 सोन्याच्या होनचं पुढे काय झालं?
नारायण शेणवी नावाच्या मराठी ते इंग्रजी भाषांतरकाराने मुंबईतील इंग्रजांच्या मुख्यालयाला कळवलं होतं की, महाराजांचा राज्याभिषेक होणार आहे. त्यांना चांगला नजराणा पाठवा. हेन्री ऑक्झिंटन हा नजराणा घेऊन आला होता. अबॅकॅरे नावाचा फ्रेंच व्यक्ती आला होता. महाराजांच्या परवाना विभागातील एका कचेरीतील प्रसंग त्याने लिहून ठेवला आहे. त्याने महाराजांच्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारला होता की, तुमच्या राजाचे व्हीजन काय आहे? अधिकाऱ्याने सांगितलं की, सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत राज्य करायचं हे महाराजांचं ध्येय होतं.
महाराज उंचावरून उडी घेऊ शकतात, ते अदृश्य होऊ शकतात. एकाचवेळी अनेक ठिकाणी असतात असा उल्लेख कॉस्मी द गार्ड, तेवेनो हे दोन परदेशी व्यक्ती करतात. मुघल, इंग्रज हे शिवाजी महाराजांना प्रचंड घाबरायचे. शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज बापबेट्यांकडून 70 जहाजे बांधून घेतली होती. हे काम त्यांनी आऊटसोर्स केलं होतं. कल्याणच्या खाडीतून आरमार पुढे आले. मस्तानी बाईंचे वडील आणि छत्रसाल बुंदेल हे बुंदेलखंडातून छत्रपती शिवाजी महाराजांकडे नोकरी मागायला आले होते. त्यांना महाराजांनी नकार दिला, त्यांनी सांगितले की तू तुझ्या भागात जा तिथे तू तुझ्या जनतेचे रक्षण कर, मदत लागली तर मी येईल. फ्रेंच प्रवासी अबॅकॅरेने वर्णनात लिहून ठेवलंय की, त्याने मुंबईतील फ्रेंच खानावळीत जेवण केलं होतं. त्याकाळी खाद्यसंस्कृती ही वैविध्यपूर्ण होती.
(वरील माहिती अमूक-तमूक या युट्यूब चॅनलवरील रोहित पवार यांच्या मुलाखतीतील आहे. रोहित पवार यांनी 'फॉरन बायोग्राफी ऑफ शिवाजी महाराज' नावाचं पुस्तक लिहिलं आहे.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world