छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. ते साल होतं 1659 चं. अफजलखान दगाफटका करणार हे महाराजांना माहित होते. त्यामुळे ते संपुर्ण तयारीने खानाच्या भेटीला गेले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या जवळ वाघनखं आणि बिचवा ठेवला होता. त्यांच्या जवळ असलेल्या वाघनखांनीच महाराजांना वाचवले. याच वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा महाराजांना बाहेर काढला होता. इतिहासात या वाघनखांना एक विशेष महत्व आहे. हीच वाघनखं पुढे लंडनला पोहोचली होती. त्यानंतर ती परत महाराष्ट्रात आणली गेली आहेत. या वाघनखांचा इतिहास आपण शिवजयंतीच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वाघनखांची मुळ संकल्पना काय?
वाघनख हे एक हत्यार आहे. त्याची संकल्पना वाघांच्या नखावरून सुचली आहे. हे हत्यार सहज लपवता येतं. वाघ आपली नखं सहज लपवतात. शिवाय ज्या वेळी हल्ला करतात त्यावेळी ते बाहेर काढले जातात. हे हत्यार डाव्या हतात सहजपण ठेवता येते. ज्या वेळी त्याची मुठ बंद केली जाते त्यावेळी हातात अंगठी घातली आहे असा भास समोरच्या व्यक्तीला होता. त्यामुळे कुणावर हल्ला करायचा असेल तर त्या काळात हे हत्यार अतिशय फायद्याचे ठरायचे. वाघनखाच्या जोडीला बिचवा हा असायचाच. वाघनखं आणि बिचवा यांचे एक कॉम्बिनेशन होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधा वेळी हीच दोन हत्यारं वापरली होती. त्याच्या सहाय्याने पहाडा साराखा दिसणारा खाना क्षणात कोसळला होता.
अफजल खानाने विडा उचलला
अफजलखानाचा वध हा 1659 साली झाला. असा उल्लेख महाराजांवर लिहीलेल्या ‘शिवाजी अँड हिज टाइम्स' या पुस्तकात आढळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले स्वराज्य स्थापन केले होते. त्यामुळे महाराजांचे वाढचे वर्चस्व त्यावेळच्या विजापूरच्या आदिल शाहला पाहावत नव्हते. अशा वेळी महाराजांनी आपले मांडलिकत्व स्विकारावे असं आदिल शाहला वाटत होते. त्यासाठी तो आग्रही आणि आक्रमक झाला होता. कोणत्या ही स्थितीत शिवाजी महाराजांना मांडलिक करण्याचा त्याचा मानस होता. आदिल शहा वयाने लहान होता. त्याच्या नावाने त्यावेळी सावत्र आई बडी बेगम ही राजकारभार पाहात होती. तीने शिवाजी महाराजांना आपले शत्रू मानले होते. त्यामुळे महाराजांना मारण्यासाठी विजापूरच्या दरबारात तिनेच विडा ठेवला होता. पण हा विडा कुणी उचलायला त्यावेळी तयार नव्हते. महाराजांचे वाढते साम्राज्य, त्यांचे पराक्रम पाहून त्यांना आव्हान देणे म्हणजे मृत्यूला ओ देण्या सारखे होते. अशा वेळी दरबारात विडा उचलण्यासाठी पुढे सरसावला होता तो अफजलखान होता. याच अफजल खानाने शहाजी महाराजांना अटक केली होती. काही झालं तरी शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करणार असा विडा अफजल खानाने उचलला.
अफजल खान स्वारीवर निघाला
अफजल खानाने विडा उचलला होता. त्याला त्याच्या ताकदीवर प्रचंड गर्व होता. शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी मला घोड्यावरून ही खाली उतरावे लागणार नाही अशी बतावणी त्याने केली होती. बंगाली इतिहासकार जदुनाथ सरकार आपल्या 'शिवाजी एंड हिज टाइम्स' या पुस्तकात याबाबतचा ठळक पणे उल्लेख करतात. तर कवींद्र परमानंद यांच्या पुस्तकातही या भेटीचा उल्लेख आहे. ते आपल्या श्री शिवभारत या पुस्तकार स्पष्ट पण लिहीतात, की 10 नोव्हेंबर 1659 साली महाराजांची आणि खानाची भेट ठरली होती. प्रतापगडाच्या पायथ्याची त्यावेळी शामियाना ही उभारला गेलाहोता. त्या आधी दोन्ही बाजूच्या पदाधिकाऱ्यांच्या चर्चा झाल्या. या चर्चेत भेटीत कोण येणार? त्यांच्या बरोबर किती जण असणार? सैन्याला आणता येणार की नाही? हे सर्व ठरले होते. खानाच्या शामियानात दोघे जण थांबणार होते. शिवाय शस्त्रे आणण्याचीही परवागनी देण्यात आली होती. महाराजांना ही शस्त्रे त्यामुळे नेता येणार होती.
महाराज खान भेटीचा दिवस
अफजल खानाची ताकद, त्याची राजकीय बुद्धीमत्ता आणि क्रुरता असा त्रिवेणी संगम म्हणजे अफजल खान हे गणित महाराजांना चांगलेच माहित होते. त्यानुसार महाराजांनी रणनिती आखली होती. भेटीचा दिवस आला होता. महाराजांनी स्व संरक्षणासाठी चिलखत घातली होती. बिचवा म्हणजेच सोबत कट्यारही होती. तर डाव्या हातात वाघनखे घातली होती. ही वाघ नखे रुस्तुमे जमाल याने दिली होती असं सांगितलं जातं. पण त्याला कोणतेही ऐतिहासिक प्रमाण नाही. महाराज प्रत्येक गोष्टीचा अतिशय बारकाईने अभ्यास करत होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अफजलखनाचा वध होता असं इतिहास तज्ज्ञ इंद्रजित सावंत सांगतात. अफजलखानाला शक्तीने नाही तर युक्तीनेच मारता येईल हे महाराजांना चांगले ठावूक होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या बरोबर वाघनखं ठेवली होती. ठरल्या प्रमाणे महाराजांनी आपल्या बरोबर जीवा महाले आणि संभाजी कावजी यांना नेले होते.
महाराज भेटीला निघाले
छत्रपती शिवाजी महाराजांनी भेटीला जाताना अंगरखा घातला होता. मराठाज् अँड दख्खनी मुसलमान या पुस्तकात आर. एम. बेंथम यांनी हे वर्णन केले आहे. महाराजांनी टोपीखाली लोखंडी शिरस्त्राण ठेवले असल्याचा ही उल्लेख यात आहे. उजव्या हाताच्या कोपऱ्यात त्यांनी छोटी कट्यार ठेवली होती. ती अतिशय बेमालूम पणे ठेवण्यात आली होती. तर डाव्या हाताच्या बोटांमध्ये वाघनखे लपवली होती. मुठ आवळल्यानंतर बोटात अंगठी घातली आहे असा भास त्यामुळे होत होता. तर अफजलखानाने आपल्या अंगात फक्त अंगरखा घातला होता. त्याला त्याच्या ताकदीवर अतिआत्मविश्वास होता. त्याने स्वरक्षणासाठी चिलखत घातली नव्हती. त्यात महाराजांनी त्याला आपण किती घाबरलो आहोत ते दाखवले होते. त्यामुळे तो निर्धास्त आणि बेसावध झाला होता.
वाघनखं आणि अफजल खानाचा कोथळा
तो दिवस होता 10 नोव्हेंबर 1659. भेट ज्या ठिकाणी ठरली होती त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजा आले होते. शामियानामध्ये अफजलखान होता. त्याच शामियानामध्ये महाराज आणि अफजल खान यांची भेट झाली. खानाने महाराजांनी मिठी मारली. त्याच वेळी त्याने महाराजांना आपल्या काखेत दाबले. शिवाय वरुन वारही केला. पण महाराजांनी चिलखत घातली होती. त्यामुळे त्यांना इजा झाली नाही. खानाने दगा केलाय हे महाराजांच्या लक्षात आले. त्यांनी कसला ही विलंब केला नाही. त्यांनी तातडीने वाघनखांनी खानावर हल्ला करत त्याला जखमी केले. आपल्याकडची कट्यार त्याच्या पोटात घुपसत वाघ नखांनी त्याचा कोथळाच बाहेर काढला. त्यावेळी सैय्यद बंडा हा महाराजांवर धावून आला. पण त्याच वेळी जीवा महालाने त्याला ठार केले. कोथळा बाहेर काढल्याने अफजल खान जबर जखमी झाला होता. तो पळत होता. पण त्याच वेळी त्याचे शिर संभाजी कावजीने कापले.
महाराजांची वाघनखं थेट लंडनला पोहोचली
जेम्स ग्रँट डफ हा ब्रिटिश सैनिक होता. शिवाय तो इस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी ही होता. विशेष म्हणजे तो इतिहासकारही होता. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य स्थापनेपासून अगदी पेशवाईच्या शेवटापर्यंत मराठ्यांचा इतिहास लिहीला आहे. त्याने हिस्टरी ऑफ मराठा हे पुस्तक लिही आहे. विशेष म्हणजे त्यांने 1817 ला झालेल्या खडकीच्या लढाईतही भाग ही घेतला होता. 1818 साली मराठा साम्राजाचा अस्त झाला. त्या काळात तो सातारा घराण्यासाठी इस्ट इंडिया कंपनीचा राजकीय प्रतिनिधी बनवा होता. त्या काळात या कामासाठी त्याला एकूण साडे तिन हजार भत्त्यासह पगार मिळत होता. त्यानो राजकीय एजंट म्हणूनही काम केलं. छत्रपती शाहू महाराजांचे मोठे पुत्र प्रतापसिंह महाराज यांच्यासोबत त्याचे चांगले संबंध होते. त्यावेळी प्रतापसिंह महाराज यांनी त्यांच्याकडे असलेली वाघनखे त्याला भेट दिली होती. त्याने ती आपल्यासोबत इंग्लडंला आणली. पुढे ही वाघनखे त्याच्या नातेवाईकांनी लंडनत्या व्हिक्टोरिया संग्रालयात ठेवली. ही छत्रपती शिवाजी महाराजांचीच वाघनखं होती.
वाघनखे परत महाराष्ट्रात
छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनखे लंडनला होती. ती भारता आणण्यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न केले गेले. त्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर चर्चाही झाली होती. ही वाघनखे हा देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठेवा आहे. महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती सर्वांना पाहाता यावी हा त्या मागचा उद्देश होता. चर्चेतल्या वाटाघाटी नुसार ही वाघनखं एक वर्षासाठी देण्याचे लंडनच्या संग्रालयाने मान्य केले. पण किमान तीन वर्षासाठी ही नखं दिली जावीत असं महाराष्ट्र सरकारने सांगितलं. शेवटी त्यांच्या मागणीला यश आले. 19 जुलै 2024 रोजी महाराजांची ही वाघनखे साताऱ्यात आणली गेली. तीन वर्षांच्या काळात ही वाघनखं मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर यासह अन्य शहरात ठेवली जाणार आहेत.