
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला 395 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने आग्रा येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते की, आग्रा शहरात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना नजरकैदेत ठेवले होते, ती वास्तू महाराष्ट्र शासनामार्फत अधिग्रहीत करून तेथे भव्य स्मारक उभारण्यात येईल. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर आता यासंबंधीचा शासन निर्णयही काढण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे शासनाचा निर्णय?
मराठा साम्राज्याने सतराव्या आणि अठराव्या शतकात भारताच्या विविध ठिकाणी आपले साम्राज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करुन रयतेचे राज्य निर्माण केले. हे राज्य निर्माण करण्यासाठी महाराजांना अनेक कष्टप्रद आव्हाने स्वीकारावी लागली. प्रसंगी काही ठिकाणी माघार सुध्दा घेऊन तह करण्यात आले. यापैकीच मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबतचा सन १६६५ मध्ये केलेला "पुरंदर तह" असाच ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला गेला. या करारानुसार महाराजांनी अनेक किल्ले मुघलांना परत केले, तसेच या तहानुसार महाराज बाळराजे शंभुराजे आणि काही निवडक मावळ्यांसह मुघल दरबारात उपस्थित राहीले.
यावेळी महाराजांचा मुघल दरबाराकडून अवमान झाल्यामुळे महाराज दरबार सोडून गेले आणि आपल्या स्वाभिमानी स्वभावाचे दर्शन घडविले. मात्र यानंतर मुघलशाहीने महाराजांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवले गेले. हा कालावधी सुमारे चार महिने होता. कालांतराने महाराजांनी आपल्या चातुर्याने आणि अत्यंत अविस्मरणीय पद्धतीने या नजरकैदेतून बाळराजे संभाजीराजेंसह मावळ्यांची सुटका करुन सुखरुप महाराष्ट्रात परत आले.
पर्यटकांसाठी प्रेरणास्थान..
अशा या ऐतिहासिक आणि महाराष्ट्रीयन अभिमानाच्या बाबी मराठी पर्यटक आग्रा येथे गेल्यानंतर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेच्या ठिकाणी राहीले त्या ठिकाणी आर्वजून जाण्याचा प्रयत्न करतो, मात्र या ठिकाणी कोणतीही ऐतिहासिक बाब, स्मारक, संग्रहालय नसल्याकारणाने या पर्यटकांना माहिती समजत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर अशाप्रकारचा अत्यंत दुर्मिळ असा केलेला पराक्रम ही इतिहासातील अत्यंत महनीय आणि अभ्यासपूर्ण बाब आहे.
दैदिप्यमान इतिहासाचे जतन....
आजही मराठीसह इतर सर्व इतिहास संशोधक या बाबीचा अभ्यास करत आहेत. ही घटना लक्षात घेता आणि मराठा साम्राज्याच्या पताका डौलाने फडकविल्या गेल्या होत्या अशा त्या महान वीरांच्या पराक्रमाची साक्ष देणारी बरीच स्थळे महाराष्ट्राच्या बाहेर अपरिचित आहेत. अशा स्थळासाठी आणि त्या दैदिप्यमान इतिहासाचे उदात्तीकरण आणि तो वारसा पुढच्या पिढयांकडे कायम रहावा, त्या स्थळांची, त्या वारशांची जतन, सवंर्धन आणि विकास करण्याकरिता शासनाने इतर राज्यातील अशी स्थळे सुध्दा विकसित करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world