Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या प्रकरणाचं राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी येत्या रविवारी (1 सप्टेंबर 2024) मुंबईत महाविकास आघाडी सरकारकडून 'जोडे मारो आंदोलन' करणार असल्याची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे यांनी ही घोषणा केली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कसं असेल आंदोलन?
महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते रविवारी सकाळी 11 वाजता हुतात्मा चौकात जमतील. संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मांना वंदन केल्यानंतर गेट ऑफ इंडियाच्या दिशेनं मोर्चा काढला जाईल. गेट ऑफ इंडियावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केलं जाईल. त्या वेळी या सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात येईल, असं ठाकरे यांनी जाहीर केलं. या आंदोलनाला शिवप्रेमींनी उपस्थित राहावं असं आवाहनही त्यांनी केलं.
'ठाणे कनेक्शन' समोर
नौदल दिन कधी नव्हे ते सिंधुदुर्गच्या किनारी झाला याचा आम्हाला अभिमान वाटला होता. त्या किनाऱ्यावर महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम घाईनं आणि श्रेय लाटण्यासाठी केलं गेलं. तो पुतळा कुणी उभारला ती कंपनी कोणती होती? या सर्वांचं 'ठाणे कनेक्शन' आता समोर आलंय. भ्रष्टाचारामुळेच हा पुतळा पडला. पुतळा उभारण्याचं टेंडर देऊन पुन्हा घोटाळा करतील, असा आरोप ठाकरे यांनी केला.
( नक्की वाचा : राजकोटवर फुल टू राडा! नारायण राणे म्हणतात 'घरातून खेचून रात्रीत मारून टाकेन' )
शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानं सर्वांच्या मनात संताप होता. त्याच्या निषेधार्थ तेथील राजकोट किल्ल्यावर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला आडवे आलेले शिवद्रोही आहेत, अशी टीकाही ठाकरे यांनी केला.