
तुळजापूर विकास आराखड्याला सरकारने तत्वत: मान्यता दिली आहे. यातील महत्त्वाच्या कामांना तातडीने निधी वितरीत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आराखड्यातील कामांमुळे येत्या दोन वर्षात तुळजापूरचा कायापालट झालेला दिसेल, असेही फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर संस्थानच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात मुख्यमंत्र्यांसमोर तुळजापूर विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विकास आराखडा राबवताना एकूण 73 एकर भूसंपादनाची गरज असल्याचे जिल्हाधिकारी पूजार यांनी सांगितले. तसेच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या बैठकीत तुळजापूर विकास आराखड्यासाठी 1866 कोटी रूपयांचा आराखडा मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी भूसंपादनाच्या कामाला वेग द्यावा अशी सूचना जिल्हा प्रशासनाला केली. यामुळे आराखड्यातील कामांनाही गती मिळणार असल्याचे ते म्हणाले.
तुळजापूरला जागतिक दर्जाचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी स्थानिक नागरिकांचा सहभाग घेत, शाश्वत विकास करण्यासाठी तुळजापूर विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. भाविकांचा त्रास कमी करून त्यांना तुळजाभवानी देवीचे सुलभ व जलद दर्शन मिळावे, सध्याच्या पायाभूत सुविधांचा दर्जात्मक विकास करून नवीन पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करण्याचे काम या आराखड्याच्या अंमलबजावणीतून होणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.
मंदिराचा इतिहास, संस्कृती, वारसा आणि आध्यात्मिक मांगल्याची जपणूक यात होणार आहे. गर्दीचे नियोजन करताना स्मार्ट क्यू सिस्टीम, ऑनलाईन दर्शन व्यवस्था, भाविकांच्या संख्येचे नियमन, रस्त्यांचे रुंदीकरण, वैकल्पिक मार्ग तयार करणे, नवीन पार्किंग व्यवस्था, वाहन पार्किंगपासून मंदिरापर्यंतची वाहतूक सेवा, शौचालयांची संख्या वाढवणे, कचरा वर्गीकरण, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्राथमिक आरोग्य सुविधांचा विस्तार, विश्रांती स्थळे, भाविक सुविधा केंद्राची उभारणी, वॉटर कुलर व आरामदायक शौचालयाची सुविधा, सूचना व मार्गदर्शन करण्यासाठी डिजिटल पद्धती (ॲप) चा वापर अशा काही सुधारणा या आराखड्यात समाविष्ट आहेत.
आराखड्यात तुळजापूर हेरिटेज टूर विकसित करण्याचे प्रस्तावित असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यामध्ये अष्टतीर्थ भेट व दर्शन, मुख्य मंदिर भेट व दर्शन, रामदरा तलावाच्या डोंगरावर तुळजाभवानी देवी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद रूपात भवानी तलवार देतानाचे 108 फूट उंचीचे भव्य शिल्प व शिव उद्यान, उद्यानात लाइट अँड साऊंड शो,रामदरा तलावात बोटिंगची सुविधा आदी बाबींचा समावेश आहे. मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या अपेक्षेनुसार आराखड्यातील कामे दोन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगतांना त्यांनी मुख्यमंत्री यांचे आभारही मानले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world