2019 मध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्षाच्या युतीचे सरकार येईल, अशी जनतेची इच्छा होती, तसे त्यांनी मतदान केले. मात्र खुर्चीसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांचे विचार तोडून, मोडून टाकण्याचे काम काही जणांनी केले. आम्ही महाराष्ट्रामध्ये दोन वर्षांपूर्वी तयार झालेले अनैसर्गिक सरकार उलथून टाकले, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. तसेच लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना कोल्हापुरी जोडा दाखवा, असा टोलाही त्यांनी लगावला. कोरेगाव विधानसभेचे उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह, खासदार उदयनराजे भोसले, महेश शिंदे, रणधीर जाधव आदी नेते यावेळी उपस्थित होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
"कोरेगावची जनता उसातल्या साखरेसारखी गोड आहे. गोड माणसांशी बोलायला, त्यांचे दर्शन घ्यायला एकनाथ शिंदे आला आहे. महेश शिंदेंनी स्वत:चा विचार न करता मतदारसंघातील विकासकामांसाठी प्रयत्न केले. त्यांना फक्त कार्यसम्राट नव्हे तर जलनायक म्हटलं पाहिजे. दोन वर्षांपूर्वी आम्ही उठाव केला तेव्हा महेश शिंदे सर्वात पुढे होते. मागचा पुढचा विचार न करता सगळे भराभरा निघाले अन् राज्यातील अनैसर्गिक सरकार आम्ही उलथून टाकले. टांगा पलटी, घोडे फरार! आम्ही तो निर्णय घेतला. बाळासाहेबांचे गहाण टाकलेले धनुष्यबाण आम्ही सोडवलं. 50 आमदार, 13 खासदार, हजारो लोकप्रतिनिधी, लाखो कार्यकर्ते आमच्या पाठिशी उभे राहिले", असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- "प्रवक्ते पद गेलं तरी चालेल...", कराळे मास्तरांनी घेतली आपल्याच पक्षाची 'शाळा')
"सातारा माझी जन्मभूमी आहे. इथे आल्यानंतर एक वेगळं समाधान मिळतं. उदयनराजेंनी सांगितलं, या पूर्वी वापरा आणि फेका अशी निती वापरणारे लोक होते. मात्र आम्ही घरात बसून नाही, शेतकऱ्याच्या दारात, शेताच्या बांधावर जातोय. त्याला मदत करतोय, अश्रू पुसण्याचे काम करतोय. हा फरक आहे. महेश माझा भरवश्याचा बॅट्समन आहे. चौकार, षटकार मारुन सेंच्युरी काढल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. स्वत:च्या जीवावर कोविड सेंटर उभारणारा महेश शिंदे मी पाहिला आहे. मी इथे फक्त विजयाच्या सभेलाच येणार होतो", असे म्हणत कोरेगावमध्ये महेश शिंदेंचा विजय फिक्स असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी बोलून दाखवलं.
(नक्की वाचा- "...तर महाराष्ट्राला कुणीही वाचवू शकणार नाही", फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरे काय म्हणाले?)
दरम्यान, कोरेगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाचे महेश शिंदे विरुद्ध शरद पवारांचे विश्वासू शशिकांत शिंदे यांच्यामध्ये लढत होत आहे. 2019 च्या विधानसभेत महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदेंना धक्का देत जायंट किलरची भूमिका बजावली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही शशिकांत शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे दोनवेळा गुलालाने हुलकावणी दिल्याने या विधानसभेला शशिकांत शिंदे यांच्या अस्तित्वाची लढाई असणार आहे.