रामराजे शिंदे
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला दारूण पराभव, काँग्रेस उमेदवारांची निराशाजनक कामगिरी यामुळे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा काँग्रेसच्या नेत्यांनी निर्णय घेतला होता. फेब्रुवारी महिन्यात हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्ष वर्णी लागली. अवघ्या 5 महिन्यांत सपकाळ यांच्याविरोधात कुरापतींना सुरुवात झाली असून ते निष्क्रीय ठरत असल्याच्या तक्रारी केल्या जाऊ लागल्या आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी थेट दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडे आपल्या तक्रारी मांडल्या आहेत. हर्षवर्धन सपकाळ हे निष्क्रीय असून ज्या मुद्दांवर आक्रमक भूमिका घेणे गरजेचे होते, त्या मुद्दांवर भूमिका घेऊन सरकारला जेरीस आणण्यात सपकाळ कमी पडल्याचे तक्रार करणाऱ्या नेत्यांचे म्हणणे आहे.
( नक्की वाचा: पक्ष सोडून नेते भाजपमध्ये का जात आहेत? काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी कारण सांगितलं )
काय आहे तक्रारी?
महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एस.चेन्नीथला यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आंदोलने उभारण्यात कमी पडले, विविध मुद्दांवर आंदोलनाची संधी असूनही काँग्रेस आंदोलने करू शकली नाही. सपकाळ यांनी सरकारला घेरण्यासाठी आतापर्यंत कोणतीही रणनिती आखलेली नाही, असे तक्रार करणाऱ्या नेत्यांचे म्हणणे आहे. तक्रार करणाऱ्या नेत्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आणि विदर्भातील नेत्यांचा समावेश आहे. यात प्रदेशाध्यक्ष राहीलेल्या आणि मंत्रीपद भूषविलेल्या एका काँग्रेस नेत्याचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
( नक्की वाचा: काँग्रेसला प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच बसणार हादरा! बडा नेता साथ सोडणार? )
कोणते मुद्दे काँग्रेसच्या हातून निसटले ?
हर्षवर्धन सपकाळ हे निष्क्रीय असून त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची धुरा पेलवणे शक्य नसल्याचे काँग्रेस नेते दिल्लीतील नेत्यांना पटवून देण्याचे काम करत आहेत. तक्रार करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय की 5 मुद्दे असे होते, ज्याबाबत काँग्रेसने ठोस भूमिका घेणे गरजेचे होते. हे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
1) मराठी भाषा
2) हगवणे प्रकरण
3) संतोष देशमुख हत्या
4) शिवाजी महाराज पुतळा प्रकरण
5) शेतकरी प्रश्नांवर आंदोलन नाही
काँग्रेसला गेल्या काही वर्षात लागलेली गळती अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी गाव आणि शहर पातळीवरील कार्यकर्ते नेतेही काँग्रेस सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. जयश्री पाटील, कुणाल पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांनी गेल्या काही दिवसांत काँग्रेसला रामराम ठोकला आहे. गळती थांबवण्यासाठीही काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेतृत्व फार काही काम करताना दिसत नसल्याची तक्रार केली जात आहे.