हॅलो, याकूब मेमनचा पैसा तुझ्या खात्यात आलाय! डॉक्टर घाबरला आणि....

घाबरलेल्या डॉक्टरने जसं सांगितलं तसं सगळं केलं.  या डॉक्टरला पोलिसांशी संपर्क करण्याचं सुचलं मात्र तोपर्यंत उशीर झाला होता

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

राहुल कांबळे

दहशतवाद्यांचा पैसा तुझ्या खात्यात आढळला आहे, असं सांगून नवी मुंबईतील एका डॉक्टरला घाबरवण्यात आलं. या डॉक्टरला सायबर फ्रॉड करणाऱ्यांनी फोनवरून सांगितलं की तुझ्या तीन बँक खात्यांमध्ये दहशतवादी याकूब मेमनचा पैसा आढळून आला आहे. यानंतर या डॉक्टरला डिजिटल अरेस्ट करण्यात आली. त्याला एका हॉटेलमध्ये स्वत:ला कोंडून घ्यायला सांगितलं. घाबरलेल्या डॉक्टरने जसं सांगितलं तसं सगळं केलं.  या डॉक्टरला पोलिसांशी संपर्क करण्याचं सुचलं मात्र तोपर्यंत उशीर झाला होता, कारण त्याने तोपर्यंत 26 लाख रुपये गमावले होते. 

हे ही वाचा : Puja Khedkar : पूजा खेडकरचा खेळ खल्लास, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम विभागात एका डॉक्टरने तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी जेव्हा या डॉक्टरकडून तपशील जाणून घेण्यास सुरूवात केली तेव्हा ते हबकले होते. इतक्या सुशिक्षित माणसालाही सायबर गुन्हेगार सहजपणे गंडा घालू लागले असल्याने पोलिसांनाही आश्चर्य वाटले आहे. डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले की एके दिवशी त्यांना अनोळखी नंबरवरून फोन आला होता. फोन उचलला असता समोरच्याने त्यांना सांगितलं की मी कस्टममधून बोलतोय आणि तुमच्या नावाने आलेलं एक पार्सल आम्हाला मिळालं आहे. विदेशातून हे पार्सल आलं असून यामध्ये बनावट कागदपत्र, पोलिसांचा गणवेश , आयकार्ड आहे.  हे सांगितल्यानंतर फोन करणाऱ्याने आता तुमचा फोन अंधेरी पोलिसांना ट्रान्सफर करत असल्याचे सांगितलं. 

हे ही वाचा : शिल्पा शिंदेच्या आरोपाने हादरलं बॉलिवूड, चित्रपट निर्मात्यावर गंभीर आरोप

डॉक्टरने फोन ट्रान्सफर करू नका असं सांगूनही हा फोन ट्रान्सफर केल्याचे भासवण्यात आलं. समोरून बोलणाऱ्याने डॉक्टरला घाबरवण्यास सुरुवात केली. पोलीस आहे असं भासवणाऱ्या व्यक्तीने या डॉक्टरला त्याचा आधार क्रमांक मागितला होता. तो डॉक्टरने दिल्यानंतर या माणसाला सांगितलं की तुझ्या आधार कार्डाशी तीन बँका जोडल्या गेलेल्या आहेत. समोरच्या व्यक्तीने या डॉक्टरला सांगितले की या खात्यांमध्ये मनी लॉण्ड्रींगचा पैसा आला असून हा पैसा दहशतवादी याकूब मेमनचा आहे.  या प्रकरणातून बाहेर यायचे असेल तर बँक अकाऊंट खात्यांसाठी आरबीआयकडून मंजुरी लागेल आणि त्यासाठी तुम्हाला 26 लाख रुपये द्यावे लागतील. घाबरलेल्या डॉक्टरनी हे पैसे देऊन टाकले. आपली फसवणूक झाल्याचे कळाल्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांशी संपर्क साधला.

फसवणूक टाळण्यासाठी काय करावे ?

नवी मुंबई सायबर क्राईम विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी सदर गुन्ह्याबाबत बोलताना म्हटले की,  अशा प्रकारे लोकांना फसवण्याचे प्रकार वाढलेले आहेत. एका रात्रीत श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवून, भीती दाखवून लोकांकडून पैसे उकळले जात आहेत. डिजिटल अरेस्ट, पार्सल फ्रॉड, शेअर बाजारात घवघवीत नफा मिळवून देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक करणे  हे मार्ग सध्या सायबर गुन्हेगार वापरत आहेत. कदम यांनी पुढे सांगितले की हे टाळायचे असेल तर अनोळखी व्यक्तीसोबत चॅटींग करू नये, व्हिडीओ कॉलिंगवर बोलू नये. कितीही भीती घातली तरी बळी न पडता पैसे ट्रान्सफर करू नये. स्कीम, शेअर मार्केटसाठी प्रलोभन दाखवलं तर त्याला बळी पडू नये आणि, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.  
 

Topics mentioned in this article