Maharashtra Rain Update : बंगालच्या उपसागरात उद्भवलेले 'मोंथा' चक्रीवादळ (Cyclone Montha) मंगळवारी रात्री आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकल्यानंतर देशाच्या अनेक भागातील नागरिकांना पावसाचा तडाखा सहन करावा लागत आहे. दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सोलापूर, सांगली वगळता आज २९ ऑक्टोबरला राज्यातील सर्व जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय आज पूर्ण विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असून विदर्भाला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय ३० ऑक्टोबरलाही राज्यभरात पावसाची शक्यता आहे. नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोरदार तडाखा सुरू आहे. कोकणातही मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करून त्वरित मदत मिळावी या मागणीचे निवेदन तालुका भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नक्की वाचा - Cyclone Montha : 'मोंथा' चक्रीवादळामुळे 5 राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रातील 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता
नंदुरबारात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान...
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कापुस, मिरची , बाजरी, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात झालेल्या पावसाचे पंचनामे न झाल्याने शेतकऱयांनी पंचनाम्यासाठी पीक देखील काढणी केली नव्हती. त्यामुळे तीन दिवस झालेल्या पावसाने उरलेले पीक देखील वाया गेले आहे. प्रशासनाच्या आडमुठे भुमिकेमुळे शेतकरी संकटात सापडला असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. अशातच तीन दिवसांच्या पावसानंतर कपाशींच्या बोंडाला कोंब फुटत असल्याचे विदारक चित्र आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी- मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे घाटमाथा या भागातही पावसाची शक्यता आहे.