सागर कुलकर्णी, मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावानुसार राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधताना ईव्हीएमवरुन खडेबोल सुनावले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नाना पटोले आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला.
नेमकं काय घडलं?
गेल्या अडीच वर्षात केलेले काम आमच्यासमोर आहे. मी म्हणालेलो 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणेन. नाहीतर मी शेती करायला जाईल. तोही शब्द आम्ही पूर्ण केला. त्यानंतर दादा आले आणि बोनस मिळाला. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला प्रचंड यश दिले. विकासाचे नवे पर्व सुरु आहे. गेल्यावर्षी यावेळी तर विरोधी पक्षनेते पदाची संख्या चिंताजनक आहे. असं व्हायला नको होतं. राहुलजी अत्यंत सक्षम समतोल आणि समन्यायी भूमिका घेऊन काम करणारे आहेत.
ते कुणावरही अन्याय करणार नाहीत. सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांनी विक्रम गेल्या वेळीच केला आहे. कमी वेळामध्ये जास्तीचे काम, निर्णय घेण्याचे काम आम्ही केले. मी नाना पटोलेंचे आभार मानतो. कारण त्यांनी नार्वेकरांसाठी जागा रिक्त केली अन् तिथून गाडी सुरु झाली. याचे क्रेडिट तुम्हालाच आहे. म्हणून नाना आमचे मित्र आहेत. नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, अशी कोपरखळीही एकनाथ शिंदे यांनी मारली.
नक्की वाचा: "नाना पटोलेंनी वाट मोकळी केली म्हणून... "देवेंद्र फडणवीसांनी पहिल्याच भाषणात मानले आभार
यावेळी एकनाथ शिंदे बोलत असतानाच जयंत पाटील यांनी तुम्ही ईव्हीएमवर निवडून आला, असा टोला लगावला. यावर बोलताना एकनाथ शिंदेंनी ईव्हीएम घोटाळा असता तर तुम्ही इथे नसता. लोकसभेला यश मिळाले तेव्हा ईव्हीएमचा मुद्दा मांडला नाही. तुम्ही तेलंगणा, कर्नाटक, झारखंड जिंकले. हरलो की ईव्हीएमवर आरोप करता. दुसरं काही तुम्हाला मिळतं नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच आता मारकडवाडीत जाऊ नका, उगाच कार्यक्रम होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
जनतेने तुमची दशा, दुर्दशा केली आता दिशा पाहून काय उपयोग. काही लोकांनी तर बहिष्कार टाकलेला दिसतोय. जनभावनेची कदर करा. सरकारच्या चांगल्या कामामध्ये सहकार्य करा. तुम्ही कमी असाल तरी आम्ही नोंद घेऊ. महाराष्ट्राला विकासाच्या महामार्गावर नेण्यासाठी सज्ज होऊ या, असे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले.