Mumbai News: मुंबईच्या सुरक्षेसंदर्भात सातत्याने रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींचा मुद्दा उचलून धरणारे मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांना मालाड मालवणीचे काँग्रेस आमदार श्री. अस्लम शेख यांनी संपवण्याची धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री लोढा यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती यांना पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार श्री. अमितजी साटम यांनी शेख यांच्या धमकीवर तीव्र संताप व्यक्त करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
राज्याचे कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी अस्लम शेख यांच्या मतदारसंघात मालवणीत वास्तव्याला असलेले हजारो रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींच्या विरोधात मोहीम उभारली आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करून सध्या तिकडे अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरु आहे. प्रशासनाने त्या भागात पहिल्या टप्प्यात ९ हजार चौरस मीटरचा सरकारी भूभाग अतिक्रमण मुक्त केला असून कारवाई अद्याप सुरूच आहे.
यासंदर्भात मंत्री लोढा म्हणाले कि, एकीकडे मुंबई सारखे आंतरराष्ट्रीय शहर दहशतवाद्यांच्या हिटलिस्ट वर असताना आमदार अस्लम शेख मालवणीत अनधिकृत बांधकामाला खतपाणी घालून ते मुंबईच्या सुरक्षेशी खेळत आहेत. हे आम्ही खपवून घेणार नाही. स्थानिक आमदार हे सातत्याने समाज विघातक शक्तीला अभय देत असून भारतीय संविधानाच्या मुल्यांना ठेच पोहचविण्याचे काम करत आहेत.
तसेच घुसखोर बांग्लादेशींच्या अनधिकृत बांधकामा विरोधातील कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करून शासकीय कामकाजात ते सातत्याने अडथळा निर्माण करत आहेत. याबाबत पाठपुरावा करत असल्यानेच त्यांनी मला आणि माझ्या परिवाराला संपवण्याची धमकी दिली असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती यांना पत्र लिहून तक्रार दाखल केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मालाड - मालवणीचे आमदार हे सातत्याने रोहिंगे आणि बांग्लादेशींच्या घुसखोरीला प्राधान्य देऊन त्यांनी मालवणी पॅटर्न राबवला आहे. चौक सभा घेऊन त्यांनी दिलेल्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. उलट त्यांचा मालवणी पॅटर्न आम्ही मुळापासून उपटून टाकणार आहोत,असा संताप मुंबई भाजप अध्यक्ष आमदार श्री.अमितजी साटम यांनी व्यक्त केला आहे. मंत्री लोढा यांनी दाखल केलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन मुंबई पोलीस आयुक्तांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणीही साटम यांनी केली आहे.
Mumbai News: मुंबईकरांसाठी Good News! पॉड टॅक्सीच्या तिकिटाची कटकट मिटली; प्रवास होणार सुपरफास्ट