राकेश गुडेकर, रत्नागिरी
शिवसेना ठाकरे गटात सध्या राष्ट्रीय पातळीपासून ते थेट प्रादेशिक पातळीपर्यंत मोठ्या पडझडीचे सत्र सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे दिल्लीत ठाकरे गटाच्या काही खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. या घडामोडी सुरू असतानाच आता कोकणातही उद्धव ठाकरेंना मोठा सुरुंग लागला आहे. शिवसेनेचे माजी रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख आणि कुणबी समाजाचे वजनदार नेते सहदेव बेटकर यांनी अधिकृतपणे भाजपचा झेंडा हाती धरला आहे.
रत्नागिरी येथे आयोजित भाजपच्या एका भव्य मेळाव्यात, रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सहदेव बेटकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बेटकर यांच्यासोबत इतरही विविध पक्षांतील अनेक स्थानिक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारल्याने कोकणात ठाकरे गटाची कोंडी झाली आहे.
(नक्की वाचा- Pune-Shirdi Railway: साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-शिर्डी पहिली थेट रेल्वे सेवा 17 जूनपासून सुरू)
भास्कर जाधवांचे पारंपरिक विरोधक
सहदेव बेटकर हे रत्नागिरी आणि गुहागर मतदारसंघाच्या राजकारणातील एक महत्त्वाचे नाव मानले जातात. विशेषतः कुणबी समाजात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यांच्या राजकीय प्रवासावर नजर टाकल्यास त्यांनी अनेक पक्षांचे उंबरठे ओलांडल्याचे दिसते.
2019 ची विधानसभा निवडणूक
सहदेव बेटकर यांनी 2019 मध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी शिवसेनेचे मातब्बर नेते भास्कर जाधव यांनी त्यांचा पराभव केला होता. पराभवानंतर बेटकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काही काळ शिवसेना (शिंदे गट) आणि त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत (उबाठा) जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. सातत्याने बदलणाऱ्या राजकीय भूमिकेनंतर अखेर आगामी राजकीय गणिते आणि कुणबी समाजाची पकड मजबूत ठेवण्याच्या उद्देशाने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
(नक्की वाचा- School Time: राज्यातील शाळांची वेळ बदलणार? ॲक्टिव्ह टीचर्स फोरमने शिक्षणमंत्र्यांकडे काय केली मागणी?)
उद्धव ठाकरे गटासाठी कोकणात मोठी पोकळी
कोकण हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर ठाकरे गटाला या भागात सातत्याने धक्के बसत आहेत. दापोली आणि गुहागर परिसरातील संघटनात्मक पोकळी भरून काढण्यासाठी ठाकरे गटाने सहदेव बेटकर यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती. मात्र, आता त्यांनीच पक्षाला रामराम ठोकल्यामुळे कोकणात, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद कमालीची घटली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सहदेव बेटकर यांचा भाजप प्रवेश महायुतीसाठी फायदेशीर, तर महाविकास आघाडीसाठी चिंताजनक मानला जात आहे.