महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाखूश असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून आली आहे. एकनाथ शिंदेंशी सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये भेट घेतल्यानंतर अमित शाह भोपाळसाठी रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये खूश नसून सरकारकडून दिल्या जाणाऱ्या निधीच्या वाटपाबाबत त्यांनी अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याची चर्चा आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सूत्रांनुसार, एकनाथ शिंदेंचा पक्ष आणि मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे आमदार आणि मंत्र्यांसोबत निधी देण्यात आणि फाइल पास करण्यासाठी भेदभाव केला जात आहे. अर्थ मंत्रालयाकडून एकनाथ शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांना सहकार्य करीत नाही. सध्या अर्थ मंत्रालय अजित पवारांकडे आहे.
या प्रकरणात अजित पवारांना माध्यमांतून विचारण्यात आलं. यावर ते म्हणाले, ही सर्व अफवा आहे. एकनाथ शिंदे आणि माझ्यामध्ये चांगले संबंध आहेत. त्यामुळे काहीही अडचण असेल तरी ते मला थेट सांगू शकतात. त्यामुळे या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही.