संजय तिवारी, सावनेर: 'मी महाराष्ट्राचा दौरा करुन ही माझी शेवटची सभा आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी जाऊन आलो आहे. महाराष्ट्राचा फील मला आला आहे. महाराष्ट्राची मानसिकता तयार झाली आहे. 23 तारखेला राज्यात महायुतीचेच सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सावनेर मतदार संघामध्ये प्रचारसभेत ते बोलत होते.
२३ तारखेला महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार आहे. सरकार आम्ही आणतो पण त्या सरकारमध्ये सावनेरचा आमदार असेल का? याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. इतके वर्ष सुनील बाबु या मतदार संघाचे आमदार राहिले. त्यांच्या काळात काय सावनेरची अवस्था राहिली, हे आम्ही सांगण्याची गरज नाही. दुर्दैवाने बारा मतदार संघातील सर्वात मागास मतदार संघ हा सावनेरचा आहे. कारण इथल्या आमदारांना माहिती होतं की विकास केला की लोक प्रश्न विचारतात. त्यामुळे लोकांना दाबून ठेवा. इथे विकासाचं नाही दादागिरीच राजकारण झालं.
'सुनिल बाबुंनीही इथे सट्ट्याचा, पट्ट्याचा, रेतीचा रोजगार दिला. चांगल्या घरातील मुलांचे आयुष्य खराब केले. माझ्या पोलिसांना सर्वात जास्त अवैध धंद्याचा त्रास सावनेर मतदारसंघाचा आहे. आपल्या जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. राज्यात तेच जिल्हे पुढारले ज्याची जिल्हा बँक जिवंत आहे. आपल्या नागपुरची अवस्था बँक काय आहे. आपली जिल्हा बँक मेली. या जिल्ह्यामध्ये कृषी आधारीत जी अर्थव्यवस्था उभी करायची होती ती संपली. हा बँकेचा घोटाळा केला कोणी? गरिबांचे, शेतकऱ्यांचे करोडो रुपये गेले, बँक बुडाली. इतक्या वर्षानंतर का होईना बँक बुडवल्याबद्दल कोर्टाने पाच वर्षाची शिक्षा सुनावली,' अशी टीका फडणवीस यांनी केली.
दरम्यान, आता त्यांनी वहिनींना समोर केलं. मला सांगा समजा त्या निवडून आल्या तर आमदार म्हणून त्या काम करतील की सुनील बाबु.आता एक खासदार निवडून आला त्याचेही काम सुनील बाबु चालवतात. इथे जर विरोधक निवडून आला तर सुनील केदारच आमदार असेल, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
महत्वाची बातमी: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! सरकारकडून सोयाबीन-कापसाचे वाढीव हमीभाव जाहीर