ओमकार कुलकर्णी, प्रतिनिधी
Dharashiv Viral Video : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी सलग चार दिवसांच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. वाढत्या गर्दीमुळे तुळजाभवानी मंदिर संस्थानने दर्शन व्यवस्थेत बदल केले आहेत.धर्मदर्शन आणि मुखदर्शन घेणाऱ्या भाविकांना बिडकर पायऱ्या मार्गे मंदिरात प्रवेश दिला जात आहे. तर पेड दर्शन अर्थात व्हीआयपी पासधारकांना मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जात आहे. दरम्यान,वाढत्या गर्दीचा अंदाज लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने व्हीआयपी पासवरही काही निर्बंध लागू केले आहेत.त्यामुळे मर्यादित पास मिळवण्यासाठी भाविकांमध्ये मोठी चढाओढ सुरू झाली.याच कारणावरून काही भाविकांमध्ये शाब्दिक वाद होऊन त्याचे रूपांतर फ्रीस्टाइल हाणामारीत झाले.
मंदिर परिसरात भाविकांमध्ये गोंधळाचं वातावरण
या घटनेचा व्हिडिओ उपस्थित भाविकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.मंदिर परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी काटेकोर नियोजन केले आहे, अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नक्की वाचा >> Maharashtra Rain : महाराष्ट्रात 'या' तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस, जूनमध्ये पाऊस पडला कमी, कारण आलं समोर
घटनेचा व्हिडीओ झाला प्रचंड व्हायरल
अतिरिक्त कर्मचारी आणि सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून भाविकांना सुरळीत दर्शन मिळावे यासाठी विविध प्रवेशमार्गांचे नियोजन करण्यात आले आहे.विनाकारण गोंधळ घालणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या तुळजापूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी कायम असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.