मुंबई, ता. 26 डिसेंबर 2024: धारावी सोशल मिशन (डीएसएम) च्या वतीने धारावीच्या कुंभारवाड्यात 20 आणि 21 डिसेंबर रोजी 2 दिवसीय लोकविकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कुंभारवाड्यातील प्रजापती सहकारी उत्पादक मंडळ येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात कुंभारवाड्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्यविषयक सुविधांचा लाभ घेतला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ज्येष्ठ नागरिकांना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरवणाऱ्या 'प्रधानमंत्री जन आरोग्य योजने'साठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची नोंदणी या शिबिरात करण्यात आली. आरोग्य सुविधांबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला कुंभारवाड्यातील ज्येष्ठ नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला असून 'आयुष्यमान भारत कार्ड'साठी शेकडो नागरिकांची नोंदणी करण्यात आली. शिबिरातील एक उल्लेखनीय क्षण म्हणजे 96 वर्षांच्या सोनाबाई कमालिया यांनी सहभाग घेतला आणि त्यांना योजनेत नोंदणी करण्यासाठी वैयक्तिक मदत देण्यात आली, जी या उपक्रमाची सर्वसमावेशकता आणि समर्पण दर्शवते.
नक्की वाचा : (भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी देणारे महर्षी हरपले, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन )
या शिबिरात 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती. शासकीय योजनांची नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी या शिबिरात पोषक वातावरण तयार करण्यात आले. यातूनच धारावी सोशल मिशनने सुमारे 7 कोटी रुपयांचा आरोग्य विमा कुंभारवाड्यातील लाभार्थ्यांना मिळवून दिला. यामुळे सुमारे 150 कुटुंबांना थेट लाभ मिळणार आहे.
दरम्यान, मुंबईच्या मध्यवर्ती भागात असूनही धारावीतील बहुतांशी लोकांना आरोग्य सुविधा देणाऱ्या शासकीय योजनांबाबत फारशी माहिती नव्हती. वैद्यकीय सुविधा घेऊ इच्छिणारे लाभार्थी आणि शासकीय योजना यांच्यातील दरी कमी करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आले.