
नागिनंद मोरे, धुळे: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई पुण्यासह राज्यातील विविध भागामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळ वारा, विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला असतानाच आता या अवकाळीचा शिक्षण विभागालाही मोठा फटका बसला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, धुळे शहरासह परिसरात काल रात्री मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली या पावसाचा फटका शहराला मोठ्या प्रमाणावर बसला असून ठिकठिकाणी रात्री झालेल्या मुसळधार या अवकाळी पावसाचा फटका धुळे शिक्षण विभागाच्या कार्यालयाला देखील बसला असून कार्यालयाला लागलेल्या गळतीमुळे शिक्षण विभागाच्या विविध महत्त्वाच्या फाईली या ओल्या झाल्या आहेत.
काल रात्री झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे शहरातील शिक्षण विभागाच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून यामुळे शिक्षण विभागातील महत्त्वाच्या फाईल या संपूर्णपणे या पाण्यामध्ये ओल्या झाल्या असून आता त्या फाईल वाळवण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे. या ओल्या झालेल्या फाईल कार्यालयाच्या बाहेर वाळत घालण्यात आले आहे.
दरम्यान, आता शिक्षण विभागाच्या कार्यालयाची दुरुस्ती करण्याची वेळ आली असून या संदर्भात आपण जिल्हा परिषदेकडे देखील कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती शिक्षण अधिकारी मनीष पवार यांनी दिली आहे.
(नक्की वाचा- Pune News : सुनेची आत्महत्या, छळ केल्याचा आरोप; राष्ट्रवादीच्या नेत्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल)
दुसरीकडे, हिंगोली शहरातील जीनमाता भागातील सुधाकर गंगावणे यांच्या घरावर काल रात्री वीज कोसळल्याची घटना घडली आहे..काल रात्री घरावर अचानक जोरात आवाज झाल्याने घरातील संपूर्ण सदस्य भयभीत झाले होते तर सदाशिव गंगावणे यांच्या आई घाबरून गेल्याने त्यांना शहरातील खाजगी रुग्णाला दाखल करण्यात आले आहे.. दरम्यान घरावर वीज कोसळल्याने गंगावणे यांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाली आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world