
शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) सूरत लुटलीच नाही. उलट सूरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तरीही काँग्रेसने शिकवण दिली की शिवाजी महाराजांनी सूरत लुटली, याची माफी काँग्रेस मागणार का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं वक्तव्य केलं आहे. फडणवीसांच्या या विधानावरून आता त्यांना ट्रोल केलं जात आहे. त्याचसोबत विरोधकांकडून आणि इतिहासकारांकडून त्यांचा हा दावा खोडून काढला जात आहे.
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर पुतळा कोसळल्याने राजकारण चांगलंच पेटलं आहे. याच घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने मोर्चा काढत जोडे मारो आंदोलन केले होते. या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं होते. नेमकं ते काय म्हणाले? 'मध्य प्रदेशात कमलनाथ मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा बुलडोझरने हटवला. याची माफी काँग्रेस मागणार का? कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा पुतळा तोडण्यात आला. त्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच काँग्रेसने शिकवलं की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. छत्रपती शिवरायांनी सूरत लुटलीच नाही. उलट सूरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तरीही काँग्रेसने शिकवण दिली की, छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली. याची माफी काँग्रेस मागणार का?' असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं आहे.
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी फडणवीसांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस खोटा इतिहास सांगतायत. तुम्हाला राजकारण करायचंय तर करा पण खोटा इतिहास सांगू नका, असे आवाहन इंद्रजीत सावंत यांनी केलं आहे. शिवरायांनी सुरतेच्या केलेल्या प्रचंड लुटीची खबर औरंगजेबास लाहोर येथे समजली होती! पण नागपूरच्या फडणवीसांना अजून ती उमजलेली नाही!,असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला आहे.
नक्की वाचा - ' तर मशिदीत घुसून..'; राणेंना वादग्रस्त वक्तव्य भोवलं, अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल
ते पुढे म्हणाले, सूरत हे औरंगजेबाचं बंदर दोन वेळा लुटण्यात आलं. 1664 अन् 1670 साली. छत्रपतींनी सुरतेवर छापा टाकला अनेक व्यापाऱ्यांना लुटून प्रचंड संपत्ती आणली. मध्य युगातील मुघलांची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी आणि स्वराज्याची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही लूट करण्यात आली होती.
फडणवीसांकडून महाराजांचा अपमान...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील फडणवीसांच्या या विधानावर एक्सवर प्रतिक्रिया दिली आहे. ''महाराजांनी सूरत लुटले नाही …चुकीचा इतिहास आहे...महाराजांच्या शौर्यावर आक्षेप…हा अक्षम्य गुन्हा आहे...एकदा नाही दोनदा लुटली...फडणवीस साहेब महाराजांचा अपमान का केलात?' असा सवाल आव्हाडांनी फडणवीसांना विचारला आहे.
श्री शिवरायानी सुरतेच्या केलेल्या प्रचंड लुटीची खबर औरंगजेबास लाहोर येथे समजली होती! पण नागपूरच्या फडणवीसांना अजून ती उमजलेली नाही!#ChhatrapatiShivajiMaharaj #SackofSurat @Dev_Fadnavis @PawarSpeaks pic.twitter.com/MXYtFDFjSF
— Indrajit Sawant History (@indraswords77) September 1, 2024
इतिहास पुन्हा पुन्हा मांडावाच लागणार..
खासदार अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. वाटलं होतं जरा विश्रांती घ्यावी… पण इतिहास पुन्हा पुन्हा मांडावाच लागणार.. “ मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर,किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर” या बहिणाबाईंच्या ओळी इतिहास बदलू पाहणाऱ्यांना सुद्धा लागू होतील अस वाटल नव्हतं..,असं खासदार अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world