सोलापूर: निवडणूक म्हटले की उमेदवाराचे चिन्ह खूप महत्वाचे असते. निवडणूक काळात मिळालेले चिन्ह प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे काम उमेदवाराला करावे लागते. परंतु तब्बल सहा वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवून सातव्यांदा विधानसभेत पोहचण्याचा विक्रम बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी केला आहे. लोकातले चिन्ह चांगले असले की निवडणूक चिन्हा ची काळजी करायची नसते, असं ते म्हणतात.
दिलीप सोपल हे 1985 मध्ये पहिल्यांदा समाजवादी काँग्रेस पक्षाच्या चरखा या चिन्हावर निवडणूक लढवत विधानसभेत पोहोचले. त्यानंतर 1990 ला काँग्रेसच्या हात चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवत आमदारकी मिळवली. 1995 मध्ये सायकल चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवत दिलीप सोपल हे आमदार झाले. 1999 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले अन् निवडणूक लढवत विधानसभेत पोहोचले. पुन्हा 2009ला अपक्ष कपबशी चिन्हावर लढले. 2014 मध्ये मोदी लाटेत ते राष्ट्रवादी काँगेसच्या घड्याळ चिन्हावर निवडून आले.
नक्की वाचा: गुजरातचे 'मुन्नाभाई'; 70 हजारांत मेडिकलची डिग्री, दवाखानेही उघडले; 14 जणांना अटक
आता 2024च्या महायुतीच्या लाटेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवत तब्बल सातव्यांदा आमदारकी मिळवली. एकूण सहा चिन्हावर सातव्यादा विधानसभेत पोहचणाऱ्या सोपल यांनी यापूर्वी राज्यमंत्री,मंत्री ,महामंडळ अध्यक्ष,तालिका सभापती,पक्ष प्रतोद,अनेक विधिमंडळ समिती अध्यक्ष यासह विधिमंडळातील अशांत टापू लॉबीचे सभापती अशी महत्वाची पदे भूषवली आहेत. सभागृहातील सर्वात जेष्ठ सदस्यांमध्ये 77 वर्षीय छगन भुजबळ यांच्यानंतर दिलीप सोपल यांचा नंबर लागतो.
आपल्या राजकीय कारकिर्दीत दिलीप सोपल यांनी एकूण 9 वेळा विधानसभा निवडणूक लढवली. यापैकी सोपल यांना दोनदा पराभवाला सामोरे जावे लागले परंतु पराभवानंतर ते दुप्पट मताधिक्याने निवडून आले हे विशेष. सर्वच राजकीय नेतृत्वाबरोबर सख्य असणारे सोपल तालिका सभापती म्हणून वेळोवेळी देवेंद्र फडणवीस यांना सभागृहात संधी देणारा मीच होतो ते ही त्यांच्याच पक्षाच्या अनेकांच्या मर्जी बाहेर जाऊन, असं अभिमानाने सांगतात.