जाहिरात

मंत्रिमंडळ विस्तार ते शिंदे सोबतचे मतभेद! फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे 10 मुद्दे

मंत्रिमंडळाचा विस्तार ते अगदी एकनाथ शिंदें बरोबर काही मतभेद झाले होते का? या सर्व प्रश्नांची दिलखूलास उत्तरं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मंत्रिमंडळ विस्तार ते शिंदे सोबतचे मतभेद! फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे 10 मुद्दे
मुंबई:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांना हात घातला. पुढील पाच वर्षात आपण कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणार आहे हे त्यांनी स्पष्ट पणे सांगितले. शिवाय ज्या लोकप्रिय घोषणा मागील महायुती सरकारने केल्या आहे, त्यांचं पुढे काय होणार हे ही त्यांनी सांगितले. त्याच बरोबर मंत्रिमंडळाचा विस्तार ते अगदी एकनाथ शिंदें बरोबर काही मतभेद झाले होते का? या सर्व प्रश्नांची दिलखूलास उत्तरं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत दिली. 

  1.  मागिल सरकार हे गतिशिल सरकार होतं. हे सरकार आता प्रगतीशिल होईल. अधिक गतीने ते पुढे जाईल. आता महाराष्ट्रा थांबणार नाही. महाराष्ट्र क्रमांक एकवर होता. यापुढेही प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरच असेल असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. आमच्या पदं बदलली असली तर आम्ही एक आहोत. तिच गती तिच दिशा आणि समन्वय यापुढे ही दिसेल असं ते म्हणाले.  
  2. मंत्रिमंडळ बैठकीत तिघांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सुचना केल्या आहेत. एकनाथ शिंदे आले त्यावेळी पन्नास ओव्हरची मॅच होती. अजित पवार आल्यामुळे ती ट्वेंटी ट्वेंटी झाली. आता टेस्ट मॅच आहे. त्यामुळे योग्य निर्णय घेवून राज्याला पुढे न्यायचे आहे. ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्या आपल्याला सुरू ठेवायच्या आहेत अशा सुचनाही केल्याचे ते म्हणाले. यातून लोकाभिमुख सरकार पाहायला मिळेल. 
  3. आता राज्याचे राजकारण हे  पुर्ण पणे वेगळे असेल. बदल्याचं राजकारण नसेल. बदल करण्याचं राजकारण असेल. महाराष्ट्रात राजकीय संवाद संपलेला नाही. अनेक राज्यात ही स्थिती नाही. महाराष्ट्रात ही संस्कृती नाही.विरोधकां बरोबर विसंवाद नसेल असंही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं. 
  4. विरोधकांची संख्या कमी आहे. त्यांच्या संख्येवर आम्ही त्यांचा आवाज मोजणार नाही. त्यांच्या संख्येवरून त्यांचे मुल्यमापन करणार नाही. त्यांच्या आवाजाचा आम्ही सन्मान करू. आमचे सरकार पाच वर्ष स्थिर असेल. जनतेची तिच अपेक्षा आहे. आधी जे धक्के लागले ते या पुढे लागणार नाहीत. असंही फडणवीस म्हणाले. 
  5. लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचा अर्थसंकल्पा वेळी विचार करू. शिवाय जे निकषात बसत नाही त्यांचा फेरविचार करणार. पण सरसकट फेरविचार करणार नाही. जे आश्वासनं दिलं आहे ते पुर्ण करू असंही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.  
  6. विधानसभा अध्यक्षाची निवड मुंबईच्या अधिवेशनात करणार आहोत. 9 डिसेंबरला ही निवड होईल. त्यानंतर राज्यपालांचे अभिभाषण होईल. तिन दिवसाचे विशेष अधिवेशन मुंबईत होईल. त्याची शिफारस राज्यपालांना केली असल्याची माहिती यावेळी फडणवीसांनी दिली. 
  7. मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर अधिवेशना पुर्वी करणार आहोत अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. सर्व गोष्टी फायनल झाल्या आहेत. काही खात्यांबाबतचा प्रश्न शिल्लक आहे. मात्र आम्ही एकत्र बसून त्यावर तोडगा काढू. त्यात कोणतीही अडचण येणार नाही असंही ते म्हणाले.  
  8. एकनाथ शिंदे आणि आमच्यात कोणातेही मतभेद नाही. एकनाथ शिंदे नाराज ही नाहीत. त्यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं यासाठी आपण त्यांना सांगितलं होतं. गिरीश महाजन हे त्यांना केवळ भेटण्यासाठी गेले होते. ते नाराज आहेत म्हणून त्यांची समजूत काढण्यासाठी गेले नव्हते असेही फडणवीसांनी स्पष्ट केलं. 
  9. आता जो फोकस आहे तो महत्वाच्या योजनावर असेल असंही ते म्हणाले. त्यात नदी जोड प्रकल्पाचं काम जोरात करणार आहे. सौर उर्जेचे प्रकल्प,जलयुक्त शिवार योजना, शक्तिपिठ महामार्ग यासाठी आपला आग्रह असेल असंही ते म्हणाले.  हे सर्व करत असताना सर्वांबरोबर संवाद साधणार असल्याचंही ते म्हणाले. 
  10. मुख्यमंत्री म्हणून पहिला निर्णय हा मुख्यमंत्री आरोग्य सेवा कक्षाबाबत घेतला. एका कॅन्सर रुग्णासाठी पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीसांनी सांगितले. त्याच चेकवर पहिली सही केली असंही ते म्हणाले.