Dnyaneshwar Mauli Palkhi : चैत्र वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी संस्थानची महत्त्वाची बैठक पार पडली असून आषाढी वारीनिमित्ताने ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं नियोजन पार पडलं आहे. राज्यभरातील वारकऱ्यांसह सर्वसामान्य आषाढी वारीची वाट पाहत असतात. यंदा ८ जुलै रोजी आळंदीतून पंढरपुरच्या दिशेने माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. दरम्यान माऊलींच्या पालखीच्या पुण्यातील मुक्कामाबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे.
पुण्यातील मुक्कामाची जागा बदलणार? l Dnyaneshwar Mauli Palkhi in Pune venue Change
सर्वसाधारणपणे ८ जुलै ते २५ जुलैपर्यंतच्या १८ दिवसांमध्ये माऊलींच्या पालखीचा पुण्यात दोन दिवस मुक्काम असतो. मात्र दिंडी समाजाच्या बैठकीत पुण्यातील मुक्कामाबाबत विविध अडचणी मांडण्यात आल्या. गेल्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यातील भवानी पेठेत पोहोचल्यावर मोठी गर्दी झाली होती. यामुळे दिंड्या पालखीपर्यंत पोहोचू शकल्या नाही. यासाठी पुण्यातील भवानी पेठेतील मुक्कामाची जागा बदलावी अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. त्यामुळे पुण्यातील भवानी पेठेऐवजी वडकी नाका येथे एक मुक्काम घ्यावा अशी मागणी करण्यात आली.
गतवर्षी पुण्याहून सासवडला पोहोचायला रात्रीचे ११ वाजले होते. हडपसर ते दिवेघाट येथे रस्त्याचं काम सुरू होतं, त्यामुळे दिंड्यांना मोठा त्रास झाला. तो कमी करण्यासाठी पुण्यात पालखी एक दिवस मुक्कामी ठेवावी आणि दुसरा मुक्काम वडकी नाका येथे ठेवावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आल्याची माहिती आहे. लोकमतने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
माऊलींच्या प्रस्थान एक तास आधी...
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान नेहमी ४ वाजता होतं. मात्र यात दिंड्यांना आपल्या जागेवर पोहोचायला उशीर होतो. त्यामुळे यंदा ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता माऊलींच्या पालखीचं प्रस्थान करण्यात येईल.