जाहिरात

तुळजाभवानी देवीचं मंदिर 22 तास खुलं; चैत्र पौर्णिमेनिमित्ताने मंदिर प्रवेशाच्या नियमातही मोठे बदल

तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला जाणार असाल तर भाविकांनी ही माहिती वाचणं आवश्यक आहे.

तुळजाभवानी देवीचं मंदिर 22 तास खुलं; चैत्र पौर्णिमेनिमित्ताने मंदिर प्रवेशाच्या नियमातही मोठे बदल

ओंकार कुलकर्णी, प्रतिनिधी

Dharashiv News : चैत्र पौर्णिमा महोत्सवानिमित्त तुळजापूर येथील आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात यंदा विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले असून महोत्सव काळात मंदिर २२ तास खुले ठेवण्यात येणार आहे. तसेच भाविकांना सुरळीत व सुलभ दर्शन मिळावे यासाठी उद्यापासून मंदिरात प्रवेशासाठी बीडकर पायऱ्या मार्गाचा वापर करण्यात येणार आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमा महोत्सव ३० मार्च २०२६ ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी या काळात राज्यासह देशभरातून लाखो भाविक तुळजापूरात दाखल होत असतात. यंदा सलग सुट्ट्या असल्याने भाविकांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिर संस्थानकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ३१ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजल्यापासून ते ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेपर्यंत सर्व भाविकांना बीडकर पायऱ्यांमार्फत मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.

नक्की वाचा - Akola News: 138 वर्षांची परंपरा बदलली! अकोल्यातील सिदाजी महाराज यात्रेत भाविकांनी काय केलं?

महोत्सवासाठी दर्शन प्रक्रियेत महत्त्वाचे बदल


गर्दीचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने या कालावधीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. महोत्सव काळात व्हीआयपी दर्शन आणि रेफरल दर्शन पास पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच ३१ मार्च ते २ एप्रिल दरम्यान ५०० रुपयांचा स्पेशल देणगी दर्शन पासही बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. दरम्यान २०० रुपयांचे सशुल्क देणगी दर्शन पासधारक, अभिषेक पासधारक तसेच धर्म दर्शन आणि मुख दर्शन घेणाऱ्या सर्व भाविकांना बीडकर पायऱ्या मार्गेच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे भाविकांना व्यवस्थित आणि सुरळीत दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर संस्थानचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आलं आहे. चैत्र पौर्णिमा महोत्सव हा तुळजाभवानी भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि उत्साहाचा सोहळा मानला जातो. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असून भाविकांनी मंदिर प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या नियोजनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com