मनिष रक्षमवार, प्रतिनिधी
Nandurbar News : शिक्षणासाठी घराबाहेर पडताना वाघांची भीती आणि बस थांबा नसल्याने तासन् तास प्रतीक्षा, यामुळे वैतागलेल्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी किटाळी येथे महामार्गावर ठिय्या दिला. त्यामुळे अडीच तास वाहतूक खोळंबली. परिणामी दुतर्फा वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
किटाळी येथून दररोज सुमारे २०० विद्यार्थी देऊळगाव आणि आरमोरी येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. हे विद्यार्थी बहुसंख्येने शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील आहेत. परिसरात वाघांची दहशत असल्याने पायी चालणे किंवा अन्य साधनांनी प्रवास करणे धोक्याचे ठरते. त्यामुळे एसटी बस हाच एकमेव सुरक्षित आधार आहे. मात्र, गावात अधिकृत थांबा असतानाही गेल्या पंधरा दिवसांपासून बस न थांबल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. अनेकांचे वर्ग बुडाले, परीक्षेची तयारीही खोळंबली.
बस थांबवा, भविष्य वाचवा... जोरदार घोषणाबाजी
या प्रश्नाकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासन व एसटी महामंडळाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. अखेर किटाळी, आकापूर, सूर्यडोंगरी व चुरमुरा येथील विद्यार्थी व ग्रामस्थांनी एकत्र येत चक्का जाम आंदोलन छेडले. बस थांबवा, विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचवा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंदोलनाची दखल घेत तहसीलदार डोणाडकर, पोलीस निरीक्षक तसेच एसटी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आंदोलकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. गावातील थांब्यावर नियमित बस थांबविण्याचे व विद्यार्थ्यांना होणारा त्रास तातडीने दूर करण्याचे लिखित आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले