संजय तिवारी: गडचिरोली, यवतमाळ, नागपूर आणि भंडाऱ्यामध्ये झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने महाराष्ट्र हादरुन गेला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू तेलंगणातील मुलुगू या गावात होता. 5.3 स्केल च्या या भूकंपाचे धक्के महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जाणवले. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपाने कोणतीही जिवीतहानी किंवा नुकसान झाल्याची माहिती समोर आली नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के विदर्भातील कित्येक ठिकाणी जाणवले आहे. या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर 5.3 अशी नोंदविण्यात आलेली आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर हे तेलंगणा जवळ असलेल्या जिल्ह्यांत देखील सौम्य झटके जाणवले, असे तेथील स्थानिकांचे म्हणणे आहे.
नक्की वाचा: संतापजनक! माजी उपसरपंचाचा १५ वर्षीय मुलीवर अत्याचार, पीडितेने विष घेतले अन्...
चंद्रपूर आणि लगतच्या गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज सकाळी 7.30 वाजता या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. या धक्क्यामूळे नागरिकात भीतीचे वातावरण दिसत आहे. गडचिरोलीमध्ये 5 ते 10 सेकंद भूकंपाचा धक्का जाणवल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भंडारा जिल्ह्यात सध्याच्या अनुषंगाने कोणत्याच प्रकारचे नुकसान किंवा जीवित हानी झाल्याची माहिती समोर आली नाही.
चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळसह नागपूरमध्येही सकाळी भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर पासून सव्वा चारशे किमी अंतरावरील तेलंगणा येथील मुलगू येथे भूकंपाचे केंद्र होते, अशी माहिती समोर आली आहे. सकाळी सात वाजून सत्तावीस मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवले. सव्वा चारशे किमी अंतरावर आलेल्या भूकंपाचे नागपुरातील काही भागात भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
दरम्यान, अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
महत्वाची बातमी: भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रिपदी निवड का होणार? 5 महत्त्वाची कारणं