राकेश गुडेकर, रत्नागिरी
अमेरिकेतील कंपनी टेस्ला बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची प्लॅन करत आहे. टेस्ला कंपनी भारतात कुठे आपला प्लांट टाकणार याकडे सर्वांच लक्ष आहे. अशातच रत्नागिरीत 'टेस्ला' सारखा प्रकल्प आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार किरण सामंत यांनी दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी हे मुंबईनंतर रेल्वे, विमान, जल व रस्ते अशा चारही वाहतुकीच्या सुविधा असणारे एकमेव ठिकाण आहे. यासाठीच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून टेस्लासारखा इलेक्ट्रिकल व्हेईकल निर्मितीचा कारखाना जिल्ह्यात आणण्याची विनंती केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीही आपल्याला पाठिंबा दर्शवला असल्याने हा प्रकल्प जिल्ह्यात आणण्यात आपल्याला निश्चित यश येईल. टेस्लासारखा आंतरराष्ट्रीय प्रकल्प आल्यास जिल्ह्याचा कायापालट होईल, असा विश्वास आमदार किरण सामंत यांनी येथे व्यक्त केला.
भारतात टेस्लाचं पहिलं शोरुम कुठे?
एलोन मस्क यांनी काही काळापूर्वीच कंपनीसाठी भारतात शोरूम उघडण्यासाठी जागा शोधली जात असल्याची बातमी समोर आली होती. टेस्ला शोरूमसाठी दिल्ली आणि मुंबईत शोध सुरू होता. पण मुंबईत कंपनीचा शोध पूर्ण झाला असल्याची माहिती आहे. टेस्लाने मुंबईतील त्यांच्या शोरूमसाठी जागा निश्चित केली असल्याचं कळतंय. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मध्ये सुरू होणार आहे. येथील व्यावसायिक संकुलात नॉर्थ अव्हेन्यूच्या तळमजल्यावर टेस्लाचे शोरूम असेल.